महापारेषणच्या लोणीकंद व चाकण या दोन्ही महत्वाच्या ४०० केव्ही अतिउच्च दाबाच्या उपकेंद्रांना वीज पुरवठा करणाऱ्या टॉवर लाईनमध्ये ५ ठिकाणी बुधवारी (दि. ९) पहाटे ४.३० च्या सुमारास बिघाड (ट्रीपिंग) झाला. त्यामुळे कोथरूड, शिवाजीनगरचा काही भाग वगळता पुणे शहर, पिंपरी व चिंचवड शहर तसेच चाकण एमआयडीसी, लोणीकंद, वाघोली परिसरात सकाळी ६ वाजेपासून वीज पुरवठा खंडित झाला आहे.
बिघाड झाल्याची शक्यता
अतिशय दाट धुके व दवं यामुळे या टॉवर लाईनमध्ये बिघाड झाल्याची शक्यता असल्याचे, महापारेषणकडून सांगण्यात आले. तसेच महत्वाचे दोन ४०० केव्ही अतिउच्च दाब उपकेंद्र बंद असल्याने, पर्यायी वीज पुरवठ्याची सोय उपलब्ध होऊ शकली नाही. दरम्यान महावितरणकडून याबाबतची माहिती वीज ग्राहकांनी नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर एसएमएसद्वारे देण्यात येत आहे.
( हेही वाचा: नाशिकमध्येही ‘पुष्पा’ पण वनविभागच निघालं ‘फायर’! )
ग्राहकांनी सहकार्य करावे
महापारेषणचे सर्व वरिष्ठ अभियंता सध्या टॉवर लाइनमधील बिघाड शोधण्यासाठी युद्धपातळीवर पेट्रोलिंग करत आहेत. सर्व ठिकाणचा वीजपुरवठा सुरळीत होण्यास किमान तीन ते चार तासांचा कालावधी लागू शकतो. सकाळी ११ वाजेपर्यंत वीज पुरवठा सुरळीत होऊ शकेल. या कालावधीत वीज ग्राहकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महापारेषण व महावितरणकडून करण्यात आले आहे.
Join Our WhatsApp Community