पंढरपूर येथे 2020 मध्ये कुंभारघाटात संरक्षक भिंत कोसळल्यानंतर, यंदा आषाढी एकादशीच्या वेळी या प्रसंगाची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी खबरदारीच्या कोणत्या उपाययोजना आखल्या? अशी विचारणा न्यायालयाने राज्य सरकारला केली आहे. तसेच, राज्य सरकारला एका आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देशही दिले आहेत.
14 ऑक्टोबर 2020 रोजी वादळी पावसामुळे कुंभारघाट येथील भिंत कोसळली. पावसापासून वाचण्यासाठी भिंतीखाली आश्रय घेतलेल्या 6 भाविकांना जीव गमवावा लागला. या घटनेला दोन वर्षे उलटूनही संबंधित कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्यात आले नाही, तसेच त्याने ही भिंत पुन्हा उभारलीही नाही. त्यामुळे हा घाट आता भाविकांसाठी असुरक्षित आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने याठिकाणी लाखो भाविक जमा होतील आणि त्यांचा जीव पुन्हा धोक्यात घालण्यात येईल, असे सोलापूरचे रहिवासी व व्यवसायाने वकील असलेले अजिंक्य संगीतराव यांनी अॅड. राकेश भाटकर यांच्याद्वारे उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. या याचिकेवरील सुनावणी सोमवारी मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठापुढे होती.
( हेही वाचा: मुख्यमंत्र्यांनी सन्मानपूर्वक राजीनामा द्यावा! एकनाथ गटाची थेट मागणी )
घाटावर जाण्यास मनाई
- 538 मीटरचे बांधकाम कंत्राटदाराने पूर्ण केले. मात्र, 2020 मध्ये मुसळधार पावसामुळे कुंभारघाटावर उभारण्यात आलेली संरक्षक भिंत कोसळली आणि 6 जणांचा जीव गेला.
- राज्य सरकारच्यावतीने, महाअधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी न्यायालयाला सांगितले की, विप्रदत्त, चंद्रभागा, कासार, महाद्वार, कुंभार, उद्धव आणि वडार या सात घाटांना एकत्र जोडण्याचा निर्णय सरकारने 2017 मध्ये घेतला.
- या घाटावरील दगड, माती साफ करण्याचे काम सुरु केले आहे. या घाटाला पूर्णपणे बॅरिकेड्स घालून नागरिकांना त्या घाटावर जाण्यास मनाई करण्यात येईल.