मुंबईत २,३६४ झाडे पडण्यामागे वादळासह आणखी कोणते होते कारण? 

वादळात पडलेली झाडे हटवण्यासाठी महापालिकेकडे वृक्ष छाटणीचे कंत्राटदारच नसल्याने अनेक ठिकाणी रस्त्यांवर अजूनही झाडे तशीच पडून आहेत.

132

मुंबईत धोकादायक झाड्यांच्या फांद्या आणि मृत झाडे कापण्यासाठी कंत्राटदारांची निवड न झालेली नसून विद्यमान कंत्राटदारांकडूनही या झाडांची छाटणी करण्यात आलेली नाही. त्यामुळेच १६,  १७ मे २०२१ रोजी ‘तौत्के’ या चक्रीवादळाने मुंबईतील सुमारे अडीच हजार झाडे आणि त्यांच्या फांद्या तुटून पडल्या. परंतु या कालावधीत केवळ ८१२ झाडेच तुटून पडल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. त्यामुळे प्रशासनाने केलेल्या दाव्यापेक्षा तिप्पट झाडे तुटून पडल्याने मुंबईतील झाडांची छाटणी झालेलीच नसल्याचे चित्र समोर आले आहे.

पडलेली झाडे अद्याप रस्त्यावरच!

मुंबईतील वृक्षांच्या फांद्यांची पावसाळ्यापूर्वी छाटणी करण्यासाठी महापालिकेने फेब्रुवारी महिन्यात निविदा मागवल्या होती. यामध्ये कंत्राटदारांनी ४५ टक्क्यांपेक्षा कमी दराने बोली लावत ही कामे मिळवली. याबाबत प्रस्ताव वृक्ष प्राधिकरणापुढे असून हा प्रस्ताव सत्ताधारी पक्षाने अडवून ठेवल्याने तौत्के चक्रीवादळाच्या काळात अनेक झाडांची पडझड झाली. ही पडलेली झाडे हटवण्यासाठी महापालिकेकडे वृक्ष छाटणीचे कंत्राटदारच नसल्याने अनेक रस्त्यांवरील झाडे आजही जैसे थेच आहे. परिणामी अनेक रस्त्यांवर झाडांच्या फांद्या आणि तुटलेली झाडे पडलेली पाहायला मिळत आहेत.

महापालिकेचा दावा ठरला फोल!

मार्च महिन्यांपासून हा प्रस्ताव अडवून ठेवल्याने भाजपने हा प्रस्ताव मंजून न केल्यास आपण न्यायालयात जाणार असल्याचा इशारा दिला. त्यानंतर उद्यान विभागाने तोत्के चक्रीवादळाच्या काळात दोन दिवसांमध्ये खासगी परिसरातील ५०४ व सार्वजनिक परिसरातील ३०८ यानुसार एकूण ८१२ झाडे पडल्याचा दावा केला. परंतु याच कालावधीत महापालिकेच्या आपत्कालिन व्यवस्थापन कक्षात झाडे पडल्याच्या तब्बल २,३६४ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यामध्ये शहरांत ६६६ झाडे, पूर्व उपनगरात ५९५ आणि पश्चिम उपनगरात १,१०३ झाडे पडली. एवढ्या मोठ्याप्रमाणात झाडे पडूनही प्रशासन मात्र, खेाटी आकडेवारी देत मुंबईकरांची दिशाभूल करत असल्याचा आरोप होत आहे.

(हेही वाचा : महापौरांकडून आपल्याच समिती अध्यक्षाला कात्रजचा घाट)

झाडे तोडण्यासाठी अद्याप कंत्राटदार नेमला नाही!

सध्या कंत्राटदार नियुक्त नसल्याने नवीन कंत्राटदारांना त्यांच्या नवीन विभागात काम करण्यासाठी उद्यान विभागाकडून दबाव आणला जात आहे. उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांच्या दबावाला काही कंपन्या बळी पडत असून काही विभागांमध्ये त्यांनी कामाला सुरुवात केली आहे, तर काही ठिकाणी ते जुमानतच नसल्याचे बोलले जात आहे. मुंबईत पावसाळ्यापूर्वी छाटणी सुरु असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. परंतु याबाबत विभागाकडे याची माहिती मागवली असता विभागाकडून त्याची आकडेवारीही दिली जात नाही.

जुन्या कंत्राटाचा कालावधी ३ जूनपर्यंत!

मुंबईतील झाडांच्या धोकादायक फांद्यांची छाटणी व मृत झाडांची कापणी ही कंत्राटदार नियुक्ती अभावी पावसाळ्यापूर्वी झालेली नाही. जुन्या कंत्राटाचा कालावधी ३ जूनपर्यंत असल्याने काहींच्या प्रभागात जो निधी शिल्लक आहे, त्या भागातील झाडांची छाटणी केली जात आहे. पण अन्य भागातील झाडांची छाटणी झालेली नाही तसेच मृत झाडेही कापली गेली नाहीत. त्यामुळेच चक्रीवादळात दोनच दिवसांमध्ये सुमारे २,४०० झाडांची पडझड झालेली आहे. त्यामुळे झाडांच्या फांद्या छाटणीचा प्रस्ताव अडवला कुणी हे वृक्ष प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून आयुक्तांनी जाहीर करावे, भाजपचे प्रवक्ते व नामनिर्देशित नगरसेवक भालचंद्र शिरसाट यांनी आव्हान दिले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.