केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून(सीबीएसई) बारावीच्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यासाठीचा फॉर्म्युला येत्या शुक्रवारी जाहीर केला जाणार आहे. सीबीएसईने यासाठी 13 तज्ञांची समिती नेमली होती, ही समिती आपला अहवाल शुक्रवारी सादर करणार आहे.
अहवाल अंतिम टप्प्यात
बारावीनंतर बरेचसे विद्यार्थी परदेशात शिक्षणासाठी जातात. तसेच अनेक विद्यार्थी वैद्यकीय, अभियांत्रिकी त्यासोबतच देशातील विविध आयआयटीतील अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतात. त्यामुळे या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यासाठी व त्यांना गुण देण्यासाठी, सीबीएसईने देश पातळीवर तज्ञांकडून सूचना मागवल्या होत्या. त्यानंतर मंडळाने 4 जून रोजी 13 जणांची समिती स्थापन केली होती. या समितीने देशातील विविध पारंपरिक आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचा आणि त्यातील अडचणींचा अभ्यास करुन, आपला अहवाल अंतिम टप्प्यात आणला आहे. तो अहवाल शुक्रवारी 18 जून रोजी मंडळाला सादर केला जाणार आहे.
(हेही वाचाः १५ दिवसांत १७ लाख विद्यार्थ्यांचा निकाल तयार होणार! एसएससी बोर्ड विश्वविक्रम करणार!)
या गुणांचा होणार विचार
बारावीच्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यासाठी त्यांचे अंतर्गत मूल्यमापन करणे हा महत्त्वाचा निकष आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या दहावी आणि अकरावी मधील गुणांचा विचार केला जाण्याची शक्यता आहे. यासोबतच बारावीच्या विद्यार्थ्यांनी मंडळाच्या ऑनलाइन अभ्यासक्रम आणि सोबतच विविध प्रकारच्या प्रात्यक्षिक, चाचण्या, तोंडी परीक्षा यांमध्ये विद्यार्थी किती प्रमाणात सहभागी होते, त्यानुसार विद्यार्थ्यांना हे गुण दिले जावेत, असे मत समितीच्या सदस्यांकडून व्यक्त करण्यात आले आहे.
(हेही वाचाः बारावीच्या निकालानंतर पदवी प्रथम वर्ष प्रवेशाचा निर्णय तातडीने!)
Join Our WhatsApp Community