BMC Commissioner Bhushan Gagrani जेव्हा सेव्हन हिल्स रुग्णालयात पोहोचतात…

सेव्हन हिल्स रुग्णालय अंतर्गत पुरवण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या आरोग्य सेवांबाबत महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक गगराणी यांनी समाधान व्यक्त केले.

1111
मुंबई महानगरपालिकेकडून खासगी सार्वजनिक सहभाग प्रकल्प अंतर्गत मरोळ (अंधेरी पूर्व) येथील सेव्हन हिल्स रुग्णालयाचे संचालन करण्यात येत आहे. या रुग्णालयाला बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी (BMC Commissioner Bhushan Gagrani) यांनी रविवारी, २ मार्च २०२५ भेट दिली. रुग्णालयामार्फत दिल्या जाणाऱ्या सर्व वैद्यकीय सेवा सुविधांची माहिती घेतल्यानंतर गगराणी यांनी समाधान व्यक्त केले.
सेव्हन हिल्स रूग्णालयातील प्रमुख वैद्यकीय सुविधा, ५० रुग्णशय्या असलेल्या अतिदक्षता विभागातील सेवा-सुविधा, डायलिसिस सेवा, रोग निदान, बाह्यरूग्‍ण विभाग आदी सेवांचीही त्यांनी पाहणी केली. त्यासोबतच वाहनतळ आणि इतर ठिकाणी जाऊन स्वच्छता, देखभाल इत्यादी कार्यवाही सुव्यवस्थित होते आहे किंवा कसे याचीही त्यांनी पाहणी केली.
bhushan 1
महानगरपालिकेचे प्रमुख वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंद्रकांत पवार, सेव्हन हिल्स रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. महारूद्र कुंभार, सेव्हन हिल्स रुग्णालयाचे सल्लागार शंकर कृष्णमूर्ती आदी या पाहणीवेळी उपस्थित होते. या पाहणीवेळी महानगरपालिका आयुक्त गगराणी (BMC Commissioner Bhushan Gagrani) यांना अधिकाऱ्यांनी सविस्तर माहिती सादर केली.
प्रमुख वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंद्रकांत पवार यांनी सांगितले की, मुंबईतील पश्चिम उपनगरांसह लगतच्या पूर्व उपनगरातील रुग्ण देखील या रुग्णालयात येतात. या ठिकाणी विशेष तसेच अतिविशेष स्वरूपाच्या वैद्यकीय सुविधा पुरविण्यात येतात. सद्यस्थितीत ३०६ रूग्णशय्या क्षमता असलेल्या या रुग्णालयात कार्डिओलॉजी, न्यूरोलॉजी, मेडिसीन सर्जरी यासह अनेक उपचार सेवा पुरविण्यात येतात. सीप्झ, विमानतळ आदी ठिकाणाहून तातडीचे उपचार आवश्यक असणारे रुग्ण देखील येथे येतात. परिसरातील मरोळ, सीप्झ आदी मेट्रो रेल्वे स्थानके लक्षात घेता नागरिकांना सेव्हन हिल्स रुग्णालयात येणे अधिक सोयीस्कर होऊ लागले आहे, असे त्यांनी नमूद केले.
विशेष कार्य अधिकारी डॉ. कुंभार यांनी माहिती दिली की, सेव्हन हिल्स रुग्णालयातील एकूण ३०६ रुग्णशय्यांपैकी २० टक्के म्हणजे ६१ रुग्णशय्या बृहन्मुंबई महानगरपालिका संदर्भित रूग्णांसाठी राखीव आहेत. या राखीव रूग्णशय्या सुविधा अंतर्गत सर्व वैद्यकीय उपचार उपलब्ध करून दिल्या जातात. तसेच, महात्मा फुले जनआरोग्य योजनेसह इतर शासकीय योजना आदींची रुग्णालयात अंमलबजावणी करण्यात येत आहे. सद्यस्थितीत या रुग्णालयाशी संबंधित प्रकरण राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण (Natinal Company Law Tribunal) यांच्याकडे न्यायप्रविष्ट आहे, असे सांगून त्याबाबत सुरू असलेल्या प्रशासकीय कार्यवाहीची संक्षिप्त माहिती देखील डॉ. कुंभार यांनी सादर केली.
पाहणीअंती, सेव्हन हिल्स रुग्णालय अंतर्गत पुरवण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या आरोग्य सेवांबाबत महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक गगराणी यांनी समाधान व्यक्त केले. तसेच रुग्णालयातील विविध विभागातील तसेच परिसरातील एकूणच स्वच्छता, परिरक्षण याबाबतही त्यांनी कौतुक केले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.