एसटी कर्मचा-यांच्या पगाराची ‘वाट’ खडतर… कधी होणार पगार?

जुलै महिन्यापासून पुढे वेतन व अन्य खर्चासाठी एसटी महामंडळाच्या तिजोरीत पैसा शिल्लक राहिलेला नाही.

76

आपला जुलै महिन्याचा पगार कधी होणार याची प्रतीक्षा लागलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना, वेतनासाठी आता सप्टेंबर महिन्याची वाट बघावी लागणार आहे. वेतनासंदर्भात पुढील आठवड्यात बैठक होणार असल्याची माहिती परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिली.

म्हणून रखडले वेतन

कोरोना आणि निर्बंधांमुळे एसटीचे उत्पन्न घटले आहे. त्यामुळे गेल्या वर्षापासूनच वेतन देणेही अवघड झाले आहे. एसटीला दैनंदिन खर्चासाठी पैसा अपुरा पडू लागल्याने महामंडळाने राज्य शासनाकडे मदतनिधी मागितला. त्यानुसार शासनाने निधी दिल्यानंतर कर्मचाऱ्यांचे गेल्या वर्षीचे आणि या वर्षीच्या सहा महिन्यांचे वेतन देण्यात आले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही एसटीचे प्रवासी आणि उत्पन्न वाढले नाही. त्यामुळे आता जुलै महिन्यापासून पुढे वेतन व अन्य खर्चासाठी एसटी महामंडळाच्या तिजोरीत पैसा शिल्लक राहिलेला नाही. परिणामी राज्यातील एसटीच्या ९८ हजार कर्मचाऱ्यांचे जुलैचे वेतन अद्याप झालेले नाही.

(हेही वाचाः डिझेलसाठी पैसे नाहीत म्हणून एसटीने घेतला मोठा निर्णय)

बैठकीत तोडगा निघणार?

वेतनावर तोडगा काढावा यासाठी परिवहन राज्यमंत्री सतेज पाटलांकडेही एसटीतील संघटनांनी मागणी केली आहे. यासंदर्भात सतेज पाटील यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी शासनाकडून दरवेळी निधी उपलब्ध झाला. परंतु कोरोनाकाळात शासनाच्या तिजोरीतही पुरेसा पैसा नाही. तरीही एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. पुढील आठवड्यात बैठक होऊन तोडगा निघेल, अशी माहिती त्यांनी दिली.

तिजोरीत खडखडाट

कोरोनामुळे एसटीच्या उत्पन्नावर परिणाम झाला असून, दैनंदिन २२ कोटी उत्पन्न देणाऱ्या आणि ६५ लाख प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या एसटी महामंडळाचे पुरते कंबरडे मोडले आहे. कोरोना संकटामुळे शाळा, महाविद्यालये पूर्ण क्षमतेने सुरू झाली नाहीत. शिवाय शासनाच्या इतर सवलती योजनेचे प्रवासी सुद्धा एसटीने प्रवास करत नसल्याने एसटीच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. डिझेलचे दर वाढल्याने सध्या मिळणारे किरकोळ उत्पन्न संपूर्णतः डिझेलवर खर्च होत आहे. त्यामुळे तिजोरीत पैसा शिल्लक राहत नसल्याचा दावा एसटी प्रशासनाकडून केला जात आहे.

(हेही वाचाः पगाराविना एसटी कर्मचा-यांची ‘घर’गाडी रखडली)

वेतनासाठी मागणी

अशा परिस्थितीत कामगार करार कायद्यानुसार एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन नियमित ७ तारखेला किंवा त्यापूर्वी करण्याच्या सूचना असतानाही वेतन अद्याप मिळाले नसल्याने, एसटी महामंडळातील मान्यता प्राप्त राज्य एसटी कामगार संघटनेने औद्योगिक न्यायालयात धाव घेतली असून, वेळेत वेतन देण्याची मागणी केली होती.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.