तुंबणा-या पाण्याची समस्या कधी संपणार? शिववासियांचा सवाल

प्रस्ताव पुन्हा एकदा प्रशासनाने स्थायी समितीला सादर केला असून, ही समिती याबाबत निर्णय घेते, की या परिसरात तुंबणाऱ्या पाण्याची समस्या कायम ठेवते, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

114

शीव प्रतीक्षा नगरमधील म्हाडा वसाहत व आसपासच्या परिसरात पावसामुळे पाणी तुंबत असल्याने, स्थानिक नागरिक मागील अनेक वर्षांपासून हैराण आहेत. त्यामुळे महापालिकेने येथील नाल्याचे रुंदीकरण करण्याचे काम हाती घेण्याचा निर्णय घेतला होता. परंतु याबाबतचा प्रस्तावच मार्च महिन्यामध्ये फेरविचारासाठी पाठवून सत्ताधारी शिवसेनेने येथील लोकांची प्रतीक्षा अधिक वाढवली. आता तोच प्रस्ताव पुन्हा एकदा प्रशासनाने स्थायी समितीला सादर केला असून, ही समिती याबाबत निर्णय घेते, की या परिसरात तुंबणाऱ्या पाण्याची समस्या कायम ठेवते, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

सर्वच पक्षांनी फेटाळला प्रस्ताव

मुंबईतील शहर व उपनगरांतील विविध ३०८ ठिकाणांवरील सखल भागातील पावसाळी पाण्याचा निचरा करण्यासाठी अनेक नाल्यांच्या रुंदीकरणाची कामे हाती घेण्यात आली आहेत. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पाठपुराव्यानुसार, या नाल्यांच्या कामांचे प्रस्ताव स्थायी समितीत तातडीने मंजूर करण्यात आले आहेत. पण अशाच प्रकारच्या प्रतीक्षा नगर येथील नाल्याच्या रुंदीकरणाचा प्रस्ताव, मार्च २०२० रोजी सत्ताधारी शिवसेनेसह सर्वच राजकीय पक्षांनी फेटाळून फेरविचारासाठी पाठवून दिला होता.

(हेही वाचाः मुंबई महापालिकेचे संगणक कालबाह्य! २७६५ नवीन संगणकांची खरेदी)

काम सुरू होण्यास विलंब

विशेष म्हणजे प्रतीक्षा नगर परिसरात शिवसेनेचे नगरसेवक व आसपासच्या परिसरात विरोधी पक्षनेते रवी राजा यांचा प्रभाग आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी तुंबत असल्याने महापालिका प्रशासनाने हा प्रस्ताव तयार करत याचे काम हाती घेण्याचा निर्णय घेतला होता. परंतु हा प्रस्ताव परत पाठवल्याने याचे काम पावसाळ्यापूर्वी सुरू होऊ शकले नाही.

प्रस्ताव परत पाठवण्याची सूचना

परंतु हाच प्रस्ताव समिती सदस्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांचे निराकरण करत पुन्हा समितीपुढे सादर केला आहे. सभागृहनेत्या विशाखा राऊत यांनी उपसूचना मांडून हा प्रस्ताव फेरविचारासाठी पाठवताना, सल्लागार म्हणून नेमण्यात आलेल्या नयन ढोलकीया यांची निवड कधी झाली होती आणि त्याचा ठराव कधी मंजूर केला होता, अशी विचारणा केली. तसेच त्यांना किती सेवा शुल्क दिले याची विचारणा केली. भाजपचे प्रभाकर शिंदे यांनी या नाल्याचे किती किमी. लांबीचे रुंदीकरण व खोलीकरण करण्यात येणार आहे, त्याची भिंत किती लांबीची बांधली जाणार आहे याची माहिती दिली नसल्याचे सांगत, या फेरविचाराच्या प्रस्तावाला पाठिंबा दिला होता. भाजपचे भालचंद्र शिरसाट यांनी हा अपूर्ण प्रस्ताव असल्याने परत पाठवण्याची सूचना केली होती.

(हेही वाचाः वाहतूक विभागाचा ‘हा’ खर्च मुंबई महापालिका उचलते)

याबाबत प्रशासनाने पाठवलेल्या अभिप्रायमध्ये सल्लागार नयन ढोलकिया यांना ९ लाख ६० हजार सल्लागार शुल्क देण्यात येणार असून त्यांना प्रकल्प सल्लागार शुल्क देण्यात येणार नाही. तसेच नाल्याची लांबी १३८० मीटर एवढी असून रुंदी २.५ मीटर एवढी आहे. तर सरासरी खोली १.५ मीटर एवढी असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आता पुन्हा प्रस्ताव माघारी फिरवून विभागातील तुंबणाऱ्या पाण्याची समस्या कायम ठेवण्याचा प्रयत्न करतात याकडे स्थानिक लोकप्रतिनिधींसह जनतेचे लक्ष असेल.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.