मुंबईतील दूषित पाणीपुरवठा कधी बंद होणार? नागरिक हैराण

शनिवारपासून ही समस्या दूर झालेली असेल, असा विश्वास जलअभियंत्यांनी व्यक्त केला आहे.

230

मुंबईत मागील चार दिवसाांपासून काही विभागांमध्ये माती मिश्रित पाण्याचा पुरवठा होत आहे. परंतु भांडुप जलशुध्दीकरण संकुलात शिरलेल्या पावसाच्या पाण्यामुळे ही समस्या निर्माण झाली होती. त्यामुळे मुंबईकरांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले असून, शहर आणि पश्चिम उपनगरांतील अनेक रहिवाशांना पिण्याच्या पाण्यासाठी मिनरल बॉटल्सचा वापर करावा लागत आहे. परंतु ही समस्या आता दूर होत असून, शुक्रवारी काही भागांमध्ये असे दूषित पाणी आढळून आले नाही. त्यामुळे शनिवारपासून ही समस्या दूर झालेली असेल, असा विश्वास जलअभियंत्यांनी व्यक्त केला आहे.

पाणीपुरवठा झाला होता बंद

मुंबईला शुध्द पाण्याचा पुरवठा करण्यापूर्वी तलाव आणि धरणांतून येणाऱ्या पाण्यावर भांडुप संकुलातील जलशुध्दीकरण केंद्रात प्रक्रिया केली जाते. 18 जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे डोंगरावरील पाणी वाहून थेट भांडुप संकुलात शिरले होते. त्यामुळे एक दिवस पाणीपुरवठा खंडित करावा लागला होता. परंतु महापालिकेच्या जलअभियंता विभागाच्या अभियंत्यांनी तातडीने येथील पाण्याचा उपसा करुन, तेथील विद्युत पंप पुन्हा सुरू केले आणि रविवारी रात्रीपासून काही भागांमध्ये पाण्याचा पुरवठा पूर्ववत झाला होता.

(हेही वाचाः मुंबईकरांनो आता पाणी उकळूनच प्या… महापालिकेचे आवाहन)

दूषित पाण्याचा पुरवठा

परंतु 19 जुलैपासून अनेक भागांमध्ये माती मिश्रित पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. संकुलात पाणी शिरल्याने अशाप्रकारचा पाणी पुरवठा होऊ शकतो, याची कल्पना असल्याने महापालिकेने आधीपासून रहिवाशांना पाणी उकळून पिण्याचे आवाहन केले होते. परंतु शुक्रवारपर्यंत ही समस्या कायमच आहे. शिवाजी पार्क भागामध्ये शुक्रवारीही माती मिश्रित पाण्याचा पुरवठा झाला होता. पाण्यामध्ये मातीचा थर भांड्याच्या तळाशी निर्माण झाल्याचे दिसून आले आहे.

जलअभियंत्यांनी व्यक्त केला विश्वास

यासंदर्भात जलअभियंता व उपायुक्त अजय राठोर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी भांडुप संकुलातील बिघाडानंतर अशाप्रकारचा पाण्याचा पुरवठा होत होता. या पाण्याचे दरदिवशी नमुने गोळा करुन, खातरजमा केली जात आहे. परंतु शुक्रवारी आता हे पाणी अशाप्रकारे येत नसून शुध्द पाण्याचा पुरवठा होऊ लागला आहे. काही जलवाहिनींमध्ये माती अडकलेली असल्यास त्यांना कदाचित शुक्रवारी असा पाण्याचा पुरवठा झाला असेल. पण हे प्रमाण शनिवारी नसेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

(हेही वाचाः भांडुप जलशुद्धीकरण संकुलात शिरणारे पाणी अन्यत्र वळवणार!)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.