-
सचिन धानजी, मुंबई
छत्रपती शिवाजी महाराज मैदानात अर्थात शिवाजी पार्कमधील (Shivaji Park) पावसाळी पाणी वाहून नेण्यासाठी वाहिन्या टाकणे, रेन वॉटर हार्वेस्टिंग करणे, मैदानाचा समतल राखणे तसेच पुरातन वारसा असलेल्या प्याऊंचे जिर्णोद्धार आदींप्रकारची कामे करण्यासाठी तब्बल तीन ते चार कोटी रुपये खर्च करण्यात आले. या अंतर्गत मैदान परिसरातील नाना नानी पार्क, स्काऊट अँड गाईड, समर्थ व्यायाम मंदिर शेजारी तसेच अन्य ठिकाणी अशाप्रकारे ३६ विहिरी तसेच सच्छिद्र वाहिनी टाकल्यानंतरही शिवाजी पार्कमध्ये (Shivaji Park) टँकरमधून पाणी आणू शिंपडावे लागत आहे. हे टँकरचे पाणीही बाहेरुन विहिरीतून आणले जात आहे.
दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज मैदान तथा पार्कमध्ये धुळीच्या प्रदुषणामुळे स्थानिक रहिवाशांना विविध आजारांचा सामना करावा लागत असल्याने या शिवाजी पार्कवर (Shivaji Park) हिरवळ निर्माण करणे आणि हिरवळ राखण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टींग करता नाना नानी पार्कच्या मागील बाजुला तसेच स्काऊट अँड गाईड हॉल व समर्थ व्यायामशाळा आदी ठिकाणी अशाप्रकारच्या रिंगवेलचे काम नव्याने केले. महापालिका प्रशासनाने मैदान परिसरात तब्बल ३६ विहिरी खोदल्या असून दैनंदिन साडेतीन लाख लिटर पाणी यातून उपलब्ध होत असल्याने मैदानावरील सिंचनाची गरज यातूनच भागवण्यात येणार असल्याचा दावा केला होता.
(हेही वाचा – CM Fellowship 25-26 : युवकांसाठी सुवर्णसंधी; मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाची घोषणा)
शिवाजी पार्कवर (Shivaji Park) यापूर्वी मनसेच्यावतीने धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी पर्जन्य जलवाहिनी टाकून रेन वॉटर हार्वेस्टींगद्वारे तुषार सिंचन यंत्रणा बसवण्यात आली होती. परंतु ही तुषार सिंचन यंत्रणा नादुरस्त झाल्याचे कारण पुढे करत तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या आमदार निधीतून शिवाजी पार्कचे सुशोभीकरण आणि अंतर्गत कामे करण्याचा निर्णय घेतला. महापालिकेच्या जी उत्तर विभागाच्यावतीने ही कामे करण्यात आली होती आणि यासाठी सुमारे ३ कोटी रुपये खर्च करण्यात आला होता.
परंतु, नव्याने बांधलेल्या विहिरी आणि जुन्या विहिरींमधील पाण्याचा वापर केला जात नसून सध्या धुळीच्या समस्येवर महपालिकेच्या जी उत्तर विभागाच्यावतीने टँकरद्वारे पाणी शिंपडले जात आहे. याबाबत मनसेचे दादर माहिमचे अध्यक्ष आणि मुंबई शहराचे उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. शिवाजी पार्कमधील (Shivaji Park) धुळीच्या समस्येवर केवळ वरवरची मलमपट्टी केली जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर अवास्तव माती टाकण्यात आली असून सध्या खोदलेल्या विहिरींसह तेथील कामांसाठी केलेला कोट्यवधी रुपयांचा पैसा मातीतच जावून पाण्यासारखा वाहून गेला आहे. त्यामुळे आज जर विहिरी कार्यान्वित असत्या तर बाहेरुन टँकर आणून पाणी शिंपडण्याची वेळ आली नसती. बाहेरुन टँकरद्वारे पाणी आणले जात असल्यामुळे तेथील विहिरींचे काय झाले हा प्रश्न निर्माण झाला आहे, असा सवाल केला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community