BMC Hospital मध्ये झिरो प्रिस्क्रिप्शन पॉलिसी कुठे? मागील ९ महिन्यांपासून अंमलबजावणी नाही

897
BMC Hospital मध्ये झिरो प्रिस्क्रिप्शन पॉलिसी कुठे? मागील ९ महिन्यांपासून अंमलबजावणी नाही

मुंबई महापालिकेच्‍या रुग्‍णालयात देण्‍यात येणाऱ्या सर्व वैद्यकीय सुविधा व औषधोपचार नागरिकांना उपलब्‍ध करुन देण्‍यासाठी ‘झिरो प्रिस्‍क्रिपशन पॉलिसी’ राबविण्यासाठी सविस्तर आढावा घेऊन सर्वंकष अहवाल सादर करावा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी तत्कालिन मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना नोव्हेंबर २०२३ रोजी दिले. परंतु, ९ महिने उलटत आले तरी अद्यापही महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांमध्ये या धोरणाचा अवलंब करण्यात आलेला नाही. महापालिकेच्या या प्रमुख रुग्णालयांमध्ये आजही रुग्णांच्या नातेवाईकांना बाहेरुन औषध आणण्यासाठी डॉक्टरांकडून चिठी सोपवली जात आहे. त्यामुळे प्रमुख रुग्णालयांमधील दाखल रुग्णांसाठी नातेवाईकांना बाहेरुनच औषधांची खरेदी करून आणावी लागत आहे. (BMC Hospital)

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नोव्हेंबर २०२३ रोजी के. ई. एम रुग्‍णालयाला भेट दिली होती. त्यावेळी रुग्ण व नागरिकांशी झालेल्‍या चर्चेदरम्यान त्यांना काही त्रुटी निदर्शनास आल्या होत्या. महानगरपालिका रुग्‍णालयात उपलब्‍ध औषधे व संसाधनांव्‍यतिरिक्‍त नातेवाईकांमार्फत रुग्णांच्या उपचारासाठी खर्च केला जातो. गरीब रुग्णांवर या खर्चाचा अतिरिक्त बोजा पडतो. आरोग्‍य उपचारावर होणाऱ्या (आऊट ऑफ पॉकेट एक्‍सपेंडीचर) खर्चामुळे साधारणतः १० टक्‍के नागरिक दारिद्रय रेषेखाली खेचले जातात. गरीब रुग्णांना महापालिकेच्या रुग्णालयांमार्फत नि:शुल्क सेवा उपलब्ध व्हावी यासाठी “झिरो प्रिस्‍क्रिपशन पॉलिसी” राबविण्याबाबत महापालिकेला मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले होते. त्यासाठी यासंदर्भात सविस्तर अभ्यास करून अहवाल सादर करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी तत्कालिन महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना दिले. परंतु आता चहल गेले आणि त्यांच्या जागी डॉ. भूषण गगराणी आयुक्तपदी विराजमान झाले. (BMC Hospital)

परंतु, आजही केईएम, शीव, नायर तसेच कुपर या वैद्यकीय महाविद्यालय आणि प्रमुख रुग्णालयांमध्ये आजही रुग्णांना तथा त्यांच्या नातेवाईकांना अनुसुचीवरील औषधांव्यतिरिक्त इतर औषधे बाहेरुन आणण्यास भाग पाडले जाते. यासाठी आजही रुग्णांच्या नातेवाईकांना बाहेरुन औषधे आणण्यासाठी चिठी दिली जात असल्याचे प्रकार पहायला मिळत आहे. या प्रमुख रुग्णालयांमध्ये आजही पुरेशी औषधे नसून अनुसूचीवरील औषधांसह इतरही आवश्यक असणारी औषधांचा मोठा तुटवडा असल्याचे रुग्णालयांमध्ये कानोसा घेतल्यानंतर ऐकायला मिळत आहे. (BMC Hospital)

(हेही वाचा – विधानसभेसाठी भाजपा बूथ स्तरापर्यंतची संघटना सक्षम करणार; Chandrashekhar Bawankule यांची माहिती)

काही रुग्णांच्या नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, डॉक्टरांकडून आम्हाला बाहेरुन औषधे आणण्यासाठी डॉक्टरांकडून चिठी दिली जाते. तर रुग्णालयांतील काही डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार अनुसुचीवरील औषधे रुग्णांना मोफत दिली जातात, परंतु जर उपलब्ध नसतील तर काही वेळा ती औषधे बाहेरून आणण्यास सांगितले. परंतु अनुसूचीवर नसलेली औषधे रुग्णालयाकडून पुरवली जात नसून ती औषधे बाहेरुनच खरेदी करावी लागतात, त्यासाठी मग चिठी दिली जाते. याबाबत महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये झिरो प्रिक्रिप्शन पॉलीसी लागू करण्यात येणार असून याबाबतची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. (BMC Hospital)

दरम्यान, याबाबत महापालिकेच्या निवृत्त वैद्यकीय अधिक्षकांच्या म्हणण्यानुसार, महापालिकेच्या ४ वैद्यकीय महाविद्यालय, १ दंत महाविद्यालय, १६ उपनगरीय रुग्णालये, ५ विशेष रुग्णालये, ३० प्रसूतिगृहे, १९२ दवाखाने सुरू आहेत. यातील महापालिकेच्या १६ उपनगरीय रुग्णालयांमध्ये सन २०१४ मध्ये तत्कालिन अतिरिक्त आयुक्त मनिषा म्हैसकर यांच्या काळात झिरो प्रिक्रिप्शन पॉलिसीचा अवलंब करण्यात आला. उपनगरीय रुग्णालयांमध्ये रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांना बाहेरील औषधे आणण्यासाठी डॉक्टरांच्या माध्यमातून चिठ्ठी दिली जात नाही. काही अपवादात्मक परिस्थितीत ५ ते १० टक्के रुग्णांना शेडुल्डवरील औषधे नसल्यास आणायला सागितले जाते. परंतु शेड्युल्डवरील औषधे बाहेरुन आणण्यास चिठी दिली तर संबंधितांना मेमो दिला जातो. परंतु रुग्णालयातील औषध साठ्याबाबत दर शुक्रवारी आढावा घेऊन कमी असलेल्या औषधांच्या खरेदीची प्रक्रिया राबवली जाते, असे निवृत्त वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. (BMC Hospital)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.