मुंबई पोलीस आयुक्त पदी कोण? रजनीश सेठ की सदानंद दाते?

अधिकाऱ्यांच्या बदलीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. आजपर्यंत गेल्या सव्वा वर्षाच्या काळात वेळोवेळी त्या त्या पद्धतीचे निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतलेले आहेत, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.   

रिलायन्स कंपनीचे प्रमुख, प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या गाडीच्या प्रकरणी एनआयएच्या अटकेत असलेल्या सचिन वाझे प्रकरणात मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची उचलबांगडी होण्याची शक्यता आहे. अशी शक्यता समोर येताच पोलीस खात्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे. सोमवारपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची एकेक पोलीस अधिकारी वर्षा बंगल्यावर जाऊन भेट घेत आहेत. मात्र ज्येष्ठतेनुसार जर या पदावर नियुक्ती करण्याचे ठरवल्यास मुंबई पोलीस आयुक्तपदी रजनीश सेठ यांचे नाव अधिक चर्चेत आहे, परंतू शिवसेनेच्या हक्काचा माणूस म्हणून सदानंद दाते किवा विवेक फणसाळकर यांच्याही नावाची चर्चा सुरु आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र यासंबंधी निर्णय मुख्यमंत्री घेतील, असे सांगत सावध पवित्रा घेतला आहे.

रजनीश शेठ यांनी घेतली गृहमंत्र्यांची भेट!

मुकेश अंबानी यांच्या घराशेजारी स्फोटकांनी भरलेली कार ठेवल्याप्रकरणी मुंबई पोलीस दलातील पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना एनआयएने अटक केली आहे. तसेच सीआययुच्या आणखी काही अधिकाऱ्याची या प्रकरणात चौकशी सुरू आहे. दरम्यान या सर्व प्रकरणाची माहिती पोलीस आयुक्तांना होती का? याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. या प्रकरणात अनेक राजकीय पुढाऱ्यांची नावे समोर येण्याची शक्यता आहे. भाजपने तर गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. अशा वेळी सरकार अधिकाऱ्याचा बळी देण्याच्या विचारात आहे, ज्यामध्ये पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या बदलीचे संकेत देण्यात येत आहेत. मुंबई पोलीस आयुक्तपदासाठी काही जेष्ठ आयपीएस अधिकाऱ्याच्या नावाची चर्चा सुरू आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी नुकतीच गृहमंत्री यांची भेट घेतली आहे. अनिल देशमुख यांच्या सरकारी बंगल्यावर रजनीश सेठ आणि देशमुख यांच्यात तब्बल तासभर चर्चा झाली. त्यांच्या नावाची जोरदार चर्चा पोलीस दलात सुरू आहे. तसेच मीरा-भाईंदर विरार पोलीस आयुक्त सदानंद दाते आणि ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याही मुंबई पोलीस आयुक्तपदी नावाची चर्चा सुरू झाली आहे.

कोण आहेत रजनीश सेठ?

सुबोधकुमार जैस्वाल यांच्या बदलीनंतर रजनीश सेठ हे राज्याच्या पोलीस महासंचालकपदाच्या शर्यतीत होते. रजनीश सेठ हे 1988 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. याआधी अतिरिक्त पोलीस महासंचालक (एडीजीपी) म्हणून कार्यरत होते. सप्टेंबर 2020 मध्ये पोलीस महासंचाल, लाचलुचपत विभागपदी बढती झाली. त्यांनी आपल्या सेवेचा बराच कालावधी मुंबईत घालवला आहे. ते पोलीस आयुक्त कार्यलयात एच क्यू 1 चे उपायुक्त होते. त्याआधी परिमंडळ दोनचे उपायुक्त होते. दक्षिण परिमंडळाचे अतिरिक्त आयुक्त होते. काही काळ ते पोलीस महासंचालक कार्यलयात होते. त्यानंतर ते मुंबई पोलीस दलात कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे सहआयुक्त होते. बढतीनंतर ते लाचलुचपत विभागात अतिरिक्त महासंचालक पदावर नियुक्त झाले. सध्या त्यांच्याकडे पोलीस महासंचालक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

अधिकाऱ्यांच्या बदलीबाबत मुख्यमंत्री घेतील निर्णय! – अजित पवार 

सुरुवातीपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे की, कोणत्याही गोष्टींमध्ये चौकशी झाली पाहिजे. चौकशीनंतर जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. त्यात कोणालाही पाठिशी घालण्याचे कारण नाही. सरकार तसे अजिबात होऊ देणार नाही. NIA आणि ATS अशा दोन यंत्रणा याप्रकरणी चौकशी करत आहेत. ज्या घटना पुढे येतात, त्यानुसार कारवाई करण्यात येईल. कोणाला मंत्रिमंडळात ठेवायचे कोणाला काढायचे हे ज्या त्या पक्षाचे काम असते. शिवसेनेच्या बाबत उद्धव ठाकरे निर्णय घेतात. अधिकाऱ्यांच्या बदलीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. आजपर्यंत गेल्या सव्वा वर्षाच्या काळात वेळोवेळी त्या त्या पद्धतीचे निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतलेले आहेत, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here