घाऊक भाजी मार्केट दादरलाच भरले जाणार!

किरकोळ विक्रेते दादर किंवा माहिम भागातील नसून, मुंबईतील विविध भागांतील आहेत. त्यामुळे या बाजारातील गर्दीमुळे दादर व माहिममध्ये कोरोनाचा संसर्ग वाढतोय असे म्हणणे चुकीचे ठरेल, असे दिघावकर यांनी स्पष्ट केले.

83

मागील काही दिवसांपासून दादरमध्ये रुग्ण संख्येची शंभरी पार झाल्यामुळे, मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दादर हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने याठिकाणी किरकोळ आणि घाऊक विक्रेत्यांचे बाजार तसेच दुकानेही आहेत. त्यामुळे हे ठिकाण गर्दीचे ठिकाण म्हणूनच ओळखले जात आहे. पहाटेच्या वेळी याठिकाणी भाजीपाल्याचा भरणारा मोठा बाजार आणि त्याठिकाणी होणारी गर्दी यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची भीती वर्तवली जात आहे. पण राज्यातील अनेक गावांमधून भाजी विक्री करण्यासाठी येणाऱ्या घाऊक बाजाराचे बस्तान अन्य भागात हलवण्याची मागणी होत असली, तरी सध्या हा बाजार उठवण्याची गरज नसून, या लोकांमुळे कोरोनाचा प्रसार होतोय असे कुठेही आढळून आले नाही. त्यामुळे दादरमधील सकाळच्या वेळी भरणारा घाऊक बाजार हा तूर्तास तरी तिथेच राहणार आहे.

दादर-माहिमचा आकडा वाढता वाढता वाढे

दादर, धारावी व माहिम या महापालिकेच्या जी-उत्तर विभागात २० मार्चपासून दैनंदिन रुग्ण हे शंभरच्या घरात आढळून येऊ लागले आहेत. २० मार्चला दादर व माहिममध्ये अनुक्रमे २८ आणि ४२ एवढे रुग्ण आढळून आले. १ एप्रिलपासून या दोन्ही भागांमध्ये प्रत्येकी शंभर रुग्ण आढळून येऊ लागले आहेत. तर ६ एप्रिल रोजी दादरमध्ये ११९ तर माहिममध्ये १०३ रुग्ण आढळून आले. त्यामुळे मागील काही  दिवसांपासून माहिम व दादरमधील या वाढत्या रुग्णसंख्येमुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

(हेही वाचाः ड्रीम मॉलबाबत कोणी केली हलगर्जी? उच्च न्यायालयातही प्रश्न उपस्थित )

मोठ्या प्रमाणावर होते गर्दी

या दोन्ही भागांमध्ये वाढणाऱ्या रुग्णसंख्येला दादर रेल्वे स्थानकाबाहेर सकाळच्या वेळी भरणारा घाऊक बाजार तसेच, फुल बाजार हाच कारणीभूत आहे. या गर्दीचे चित्रण प्रसार माध्यमातून दाखवले जात आहे. याठिकाणी सुरक्षित अंतर राखले जात नाही. त्यामुळे हे वाढत्या गर्दीचे ठिकाण असल्यामुळे हा बाजार बंद करण्याची मागणी केली जात आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांनीही काही दिवसांपूर्वी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसोबत दादरची पाहणी करताना, हा बाजार अन्य जागेत हलवण्याची सूचना केली होती. मागील वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा बाजार वांद्रे-कुर्ला संकुल, दहिसर जकात नाका तसेच मुलुंड जकात परिसरात विभागून भरवण्यात येत होता. तसेच सोमय्या मैदानातही काही प्रमाणात हा बाजार भरवला जात होता.

बाजार हलवणे अशक्य

वांद्रे-कुर्ला संकुल, दहिसर जकात नाका परिसर, मुलुंड जकात नाका परिसर आदी भागांमध्ये जंबो कोविड सेंटर बांधण्यात आले आहेत. तर सोमय्या मैदानाचा एकमेव पर्याय असला तरी मुंबईतील सर्व मैदान व उद्यानांच्या जागा खुल्या ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे सोमय्या मैदानांच्या जागेत हा बाजार हलवता येणार नाही. मागील वेळेस सर्व मैदाने व उद्याने ही पूर्णपणे बंद असल्यामुळे, त्याठिकाणी हे बाजार भरवण्यात आले होते. पण आता तशी परिस्थिती नसल्याने बाजार अन्य ठिकाणी हलवण्याचा पर्याय सध्या तरी दिसत नसल्याचे जी-उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी स्पष्ट केले.

(हेही वाचाः अन्य दुकाने ठराविक दिवशी तरी सुरू राहू द्या! भाजप नगरसेविकेची आयुक्तांकडे मागणी)

सुरक्षित अंतर राखण्याचे निर्देश

दादरच्या घाऊक बाजारात राज्यातील अनेक गावांमधून शेतकरी भाजीपाला घेऊन येत असतात. हे शेतकरी तसेच घाऊक भाजी विक्रेते टेम्पोमधून भाजीपाला आणून विकतात आणि अवघ्या काही तासांमध्ये परत निघून जातात. तसेच जे किरकोळ विक्रेते आहेत ते याठिकाणी घाऊक भाजीची खरेदी करुन निघून जातात. हे किरकोळ विक्रेते दादर किंवा माहिम भागातील नसून, मुंबईतील विविध भागांतील आहेत. त्यामुळे या बाजारातील गर्दीमुळे दादर व माहिममध्ये कोरोनाचा संसर्ग वाढतोय असे म्हणणे चुकीचे ठरेल, असेही दिघावकर यांनी स्पष्ट केले. मात्र, या बाजारामध्ये सुरक्षित अंतर राखून व्यवसाय करावा, असे निर्देश देण्यात आले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.