आयपीएस अधिकाऱ्यांना परमबीर सिंग यांची का वाटते भीती? वाचा… 

पोलिस महासंचालक संजय पांडे यांच्यात फोनवर झालेल्या संभाषणाचे रेकॉर्डिंग परमबीर सिंग यांनी उच्च न्यायालयात सादर केले. या याचिकेवर ४ मे रोजी सुनावणी होणार आहे.

राज्याचे पोलिस महासंचालक संजय पांडे यांच्या सोबत फोनवर झालेल्या संभाषाणाच्या रेकॉर्डिंगसह मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. दाखल केलेल्या या याचिकेवरून, तसेच फोन रेकॉर्डिंग होत असल्याने आयपीएस लॉबीमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, त्यामुळे परमबीर सिंग यांच्याशी फोनवर बोलतांना काळजी घ्यावी लागेल, अशी चर्चा सध्या जेष्ठ अधिकाऱ्यांमध्ये सुरू आहे.

न्यायालयात फोन रेकॉर्डिंग सादर केले!

पोलिस निरीक्षक अनुप डांगे यांनी मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपाची चौकशी राज्याचे पोलिस महासंचालक संजय पांडे यांच्याकडे देण्यात आली आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू असताना मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी सरकारविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेत त्यांनी ‘माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात करण्यात आलेले आरोप मागे घ्या, अन्यथा सरकार तुमच्यावर आणखी गुन्हे दाखल करेल, असे पोलिस महासंचालक संजय पांडे यांनी आपल्याला सांगितले, असे सांगत संजय पांडे यांच्यात फोनवर झालेल्या संभाषणाचे रेकॉर्डिंग न्यायालयात सादर केले आहे. या याचिकेवर ४ मे रोजी सुनावणी होणार आहे.

(हेही वाचा : मागील ५ महिन्यांत सरकार झोपले होते का? चंद्रकांत पाटील यांचे मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र )

पोलिस दलात चिंतेचे वातावरण पसरले!

महासंचालक दर्जाचा अधिकारीच दुसर्‍या महासंचालकाचे संभाषण टॅप करत असल्याने पोलिस दलात चिंतेचे वातावरण पसरले आहे. या फोन टॅपिंगमुळे पोलिस अधिकारी यांच्याशी फोनवर कुठल्याही प्रकरणावर बोलताना आयपीएस अधिकारी काळजी घेताना दिसत आहे. त्यात परमबीर सिंग यांचा फोन आल्यास त्यांच्यासोबत बोलताना अधिकच काळजी घ्यावी लागणार असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. १०० कोटी रुपयांच्या लेटरबॉम्बमुळे माजी गृहमंत्री यांच्या अडचणी वाढल्या असल्या तरी हा लेटरबॉम्ब फोडून परमबीर सिंग यांनी स्वतःच्या देखील अडचणी वाढवून घेतल्या असल्याची चर्चा पोलिस दलात सुरू आहे. अनुप डांगे, भीमराव घाडगे या पोलिस अधिकारी यांनी परमबीर सिंग यांच्या विरोधात गंभीर आरोप करून तक्रारी दाखल केलेल्या आहेत. या दोन्ही तक्रारी सरकारने दखल करुन घेतल्या असून एका प्रकरणात राज्याचे पोलिस महासंचालक हे स्वतः चौकशी करीत असून दुसऱ्या प्रकरणात परमबीर सिंग यांच्यासह ३३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अकोला पोलिसांकडून गुन्हा कल्याणमध्ये वर्ग!

अकोला पोलीस नियंत्रण कक्ष येथे कार्यरत असलेले पोलिस निरीक्षक भीमराव घाडगे यांच्या तक्रारअर्जावरून सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात परमबीर सिंग यांच्यासह ३३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार कल्याणमधील असल्यामुळे अकोला पोलिसांनी हा गुन्हा कल्याणमधील बाजारपेठ पोलिस ठाण्याकडे पुढील तपासासाठी वर्ग केला आहे. या गुन्ह्याचा तपास येथील सहायक पोलिस आयुक्त अनिल पोवार यांच्याकडे देण्यात आला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here