एरव्ही बंदच्या दिवशी अर्धे शटर डाऊन करुन सुरू करण्यात येणारी हॉटेल्स सोमवारी महाराष्ट्र बंदच्या दिवशी पूर्णपणे बंद ठेवण्यात आली. राज्यातील महाविकास आघाडी सकरामधील पक्षांनी पुकारलेल्या या बंदला हॉटेल व्यावसायिकांनी आपली हॉटेल्स चार वाजेपर्यंत बंद ठेऊन पूर्णपणे पाठिंबा दिला.
कोविड काळामध्ये सरकारमधील प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेनेने हॉटेल्स व्यावसायिकांचे कुठेही नुकसान होणार नाही याची काळजी घेतली होती. त्याची कृतज्ञता म्हणून बंदच्या दिवशी हॉटेल्स बंद ठेवत व्यावसायिकांनी एकप्रकारे सरकारचे पांग फेडले आहेत. त्यामुळे कोविड काळातील केलेल्या मदतीची परतफेड या माध्यमातून हॉटेल्स व्यावसायिकांकडून करुन घेतल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे.
(हेही वाचाः आज ‘महाराष्ट्र बंद’… मग वसुलीचं काय?)
हॉटेल्स शिवसेनेच्या ऋणाखाली
महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला मुंबईतील सर्व हॉटेल्सनी बंद ठेवत पाठिंबा दिला. मुंबईतील सर्व हॉटेल्स बंदच्या दिवशी चार वाजेपर्यंत बंद ठेवली जातील, अशाप्रकारचे इंडियन हॉटेल्स अँड रेस्तराँ असोशिएशनने जाहीर करत सर्व हॉटेल्सना तसे आवाहनही केले होते. परंतु आजवर कोणत्याही बंदला न जुमानणारी हॉटेल्स यंदा राज्यातील सत्ताधारी शिवसेनेच्या ऋणाखाली असल्याने त्यांनी या बंदला पाठिंबा दिल्याचे बोलले जात आहे.
(हेही वाचाः ‘महाराष्ट्र बंद’ विरोधात भाजपा उच्च न्यायालयात जाणार!)
लॉकडाऊनमध्ये हॉटेल व्यावसायिकांवर विशेष लक्ष
कोविड काळात महाराष्ट्र सरकारच्यावतीने सर्वात जास्त काळजी हॉटेल व्यावसायिकांची घेण्यात आली होती. लॉकडाऊनमध्ये सर्वप्रथम हॉटेल्सना पार्सल सुविधा चालू ठेवण्यास परवानगी देत, त्यांचा धंदा वाचवण्यावर भर देण्यात आला. त्यानंतर कालांतराने ५० टक्के क्षमतेने हॉटेलमध्ये सर्विस देण्यास परवानगी दिली गेली. तीन वाजेपर्यंत असणारी हॉटेल सेवा रात्री दहा वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी मिळाली. हॉटेल व्यावसायिकांचे शिष्टमंडळ आणि ‘आहार’ संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनीही सरकारला निवेदन दिल्यानंतर तसेच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेऊन विनंती केल्यानंतर ही हॉटेल्स टप्प्या-टप्प्याने सुरू करण्यात आली होती.
(हेही वाचाः बेस्ट महाव्यवस्थापक आणि आगार प्रमुखांना मेस्मा लागणार का?)
हॉटेल्स व्यावसायिकांवर मेहेरबानी
एवढेच नाही तर मुंबईमध्ये पक्षाच्या आशीर्वादामुळे संशयित कोविडबाधित रुग्णांना तसेच परदेशातून येणाऱ्या पर्यटकांना क्वारंटाईन करण्यासाठी हॉटेल्सचा वापर करण्यात आला होता. त्यानंतर डॉक्टर आणि महापालिका कर्मचाऱ्यांसाठीही याच हॉटेलचा वापर करण्यात आला. याशिवाय कोविडच्या दुसऱ्या टप्प्यात दर निश्चित करुन परदेशातून येणाऱ्या पर्यटकांना निश्चित केलेल्या हॉटेल्समध्ये राहण्याची सुविधा उपलब्ध करुन देत त्यांना व्यवसाय उपलब्ध करुन दिला गेला. याबरोबरच ज्या हॉटेल्सकडून ही सुविधा घेण्यात आली होती, त्यांना मालमत्ता कराबाबत वेलनेस पॅकेज देण्यात आले.
(हेही वाचाः महाराष्ट्र बंद : ‘बेस्ट’च्या बसगाड्या आगारातच फोडल्या?)
कोविडपूर्वी मुंबईतील सर्व हॉटेल्सना मान्सून शेड बांधण्यास परवानगी देण्याचा प्रश्न तत्कालिन महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांच्याशी बैठक घेत आदित्य ठाकरे यांनी निकालात काढला होता. त्यामुळे एकप्रकारे हॉटेल व्यावसायिक हे शिवसेनेच्या ऋणाखाली असून, त्यामुळेच त्यांनी या बंदला पाठिंबा देत त्यांचे पांग फेडल्याची जोरदार चर्चा ऐकायला मिळत आहे.
Join Our WhatsApp Community