खड्ड्यांचा दोष अभियंत्यांच्या माथी का? मटेरियल आधी तपासा

कोल्डमिक्सने भरललेल्या खड्डयातील मटेरियल वाहून गेले आणि पुन्हा खड्डे पडले. त्यामुळे या खड्डयांसाठी नक्की कोणते मटेरियल योग्य आहे, याची तपासणी करण्याच्या सूचना केल्या होत्या.

92

मुंबईतील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांवरून सत्ताधारी शिवसेना पक्षाकडून अभियंत्यांना टार्गेट केले जात असतानाच आता अभियंत्यांनीच खड्ड्यांसाठी वापरण्यात येणाऱ्या तंत्रज्ञानाबाबतच शंका उपस्थित केली आहे. खड्ड्यांसाठी ज्या कोल्डमिक्स मटेरियलचा वापर केला जातो त्याचा आढावा घेतला जावा आणि कोल्डमिक्सचा वापर करणे कितपत यशस्वी ठरले आहे याची तपासणी करावी, अशी मागणी अभियंत्यांच्या संघटनेने महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

प्रत्येक विभागांमध्ये खड्ड्यांबाबत अभियंत्यांना जबाबदार धरले!

मुंबईतील रस्त्यावरील खड्ड्यांचे प्रमाण वाढल्यानंतर चारही बाजुंनी होणाऱ्या टिकेने तसेच प्रसारमाध्यमातून होणाऱ्या बातम्यांनंतर महापौर किशोरी पेडणेकर यांनी पूर्व उपनगरातील खड्ड्यांची पाहणी केली. यावेळी अंधेरी-कुर्ला रोडवरील खड्ड्यांबाबत महापौरांनी अभियंत्यालाच जबाबदार धरले. त्यामुळे प्रत्येक विभागांमध्ये खड्ड्यांबाबत अभियंत्यांना जबाबदार धरले जात असल्याने म्युनिसिपल इंजिनिअर्स असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. सुखदेव काशिद यांनी महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांना निवेदन दिले आहे. यामध्ये त्यांनी रस्त्यांवरील खड्डे आणि त्यावरील उपाययोजनांबाबत चिंता व्यक्त केली. तत्कालिन अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) यांच्या निर्णयानंतर हॉटमिक्स ऐवजी कोल्डमिक्स मटेरियलने खड्डे भरण्यासाठी पुरवले जात असल्याची आठवण करून दिली. कोल्डमिक्स वापरुन आजमितीस खड्डे भरले जात आहे. गणेशोत्सवापूर्वी सर्व खड्डे भरण्यात आले होते. परंतु भरलेले खड्डे पुन्हा उखडले गेल्याचे आपण पाहिले आहे. त्यामुळे कोल्डमिक्स मटेरियल वापरुन खड्डे भरण्याच्या पध्दतीचा आढावा घेतला जावा व कोल्डमिक्सचा वापर करणे कितपत यशस्वी झाले आहे, याची तपासणी करावी. कोल्डमिक्स वापरुनही पुन्हा पुन्हा खड्डे पडत असतील, तर रस्ते अभियंत्यांनी करायचे काय, असा सवाल केला आहे.

(हेही वाचा : श्री काशीविश्वेश्वर मंदिरातील २३० वर्षांपूर्वीच्या पाषाण मूर्ती गायब)

खड्ड्याला जबाबदार वरिष्ठ अधिकारीच

मुंबईतील अनेक महत्वाचे रस्ते दुरुस्तीच्या पलिकडे गेले आहेत. त्या रस्त्याच्या पुनर्बांधणीची गरज असतानाही निर्णय प्रक्रियेतील दिरंगाईमुळे अजुनही रस्त्यांची कामे सुरु झालेली नाहीत. यामध्ये एल विभागातील अंधेरी-कुर्ला मार्ग हा रस्ता विमानतळाकडे जाणारा महत्त्वाचा रस्ता असून या रस्त्याच्या सुधारणेसाठीचा निर्णय अद्यापही फेरनिविदेच्या घोळात सहा महिन्यांपासून अडकून आहे. त्यामुळे दुरुस्ती पलिकडे असलेल्या रस्त्यांबाबत रस्ते अभियंत्यांना दोष देवून कसं चालेल, असा सवाल केला आहे. प्रशासन व समित्यांमधील निर्णयप्रक्रियेतील दिरंगाई टाळावी, जेणेकरून नागरिकांना चांगले रस्ते लवकर मिळतील, असे स्पष्ट करत एकप्रकारे १२०० कोटी रुपयांच्या निविदांना झालेला विलंब आणि आता कमी दरात आलेल्या या निविदांबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर फेरनिविदा काढण्याच्या प्रशासनाने घेतलेल्या निर्णयामुळे रस्त्यांची वाट लागली असल्याचे सांगत संघटनेने या खड्डयांना वरिष्ठ अधिकारीच जबाबदार असल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी खड्ड्यांबाबत हरकतीचा मुद्दा उपस्थित केला होता. यामध्ये त्यांनी एक खड्डा कोल्डमिक्सने भरला होता, तर एक दुसऱ्या मटेरियलने भरले होते. पण कोल्डमिक्सने भरललेल्या खड्डयातील मटेरियल वाहून गेले आणि पुन्हा खड्डे पडले. त्यामुळे या खड्डयांसाठी नक्की कोणते मटेरियल योग्य आहे, याची तपासणी करण्याच्या सूचना केल्या होत्या. यावर स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी एवढे खड्डे जर बुजवले जात असतील, तर ते टिकत नाही, त्याच्या दर्जाची तपासणी केली जावी, असेही निर्देश प्रशासनाला  दिले होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.