अहमदिया मुसलमानांचा पाकिस्तानात छळ का होतोय? कोण आहेत अहमदिया मुसलमान?

171

आपल्या सर्वांनाच माहिती आहे की पाकिस्तानात अल्पसंख्याक सुरक्षित नाहीत. पाकिस्तानच्या निर्मितीपासून अल्पसंख्याकांचा कमी झालेला आकडा चिंतेचा विषय बनला आहे. त्यात आता पाकिस्तान आर्थिकदृष्ट्या देखील कोलमडला आहे. अल्पसंख्याक म्हणजे गैर-मुस्लिम. परंतु अहमदिया मुस्लिम देखील पाकिस्तानच्या मते अल्पसंख्याक आहेत आणि गैर-मुस्लिमांवर ज्याप्रमाणे अत्याचार केले जातात, तसेच अत्याचार अहमदिया मुस्लिमांवर केले जातात. मग हे अहमदिया मुसलमान आहेत तरी कोण? पाकिस्तान आपल्याच लोकांवर अत्याचार का करतोय?

हल्लीच पाकिस्तान कराचीतील कादियानी मशिदीवर हल्ला झाला आणि तोडफोड करण्यात आली. एका महिन्यात दोन वेळा मशिदीवर हल्ला झाला आहे. तहरीक-ए-लब्बैक या कट्टरपंथीयांनी या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. महत्वाचं म्हणजे तहरीक-ए-लब्बैक हा एक राजकीय पक्ष असून इमरान खान यांचे या पक्षाला समर्थन होते. आता प्रश्न असा आहे की मशिदीची तोडफोड का करण्यात आली? कारण ही मशिद अहमदिया मुस्लिमांची आहे.

१९७४ मध्ये पाकिस्तानच्या तत्कालीन सरकारने अहमदिया मुस्लिमांना गैर-मुस्लिम घोषित केले आहे. अहमदिया मुस्लिमांवर पाकमध्ये अनेकदा हल्ले झाले आहेत, त्यांच्यावरील हिंसेच्या घटना देखील नवीन नाही. इतकंच काय तर त्यांना मुस्लिम म्हणू नये, यावर प्रतिबंध लावण्यात आला आहे. ते आपल्या पंथाचा प्रचार करु शकत नाहीत आणि सऊदी अरबमध्ये तीर्थयात्रेला देखील जाऊ शकत नाहीत. भूतपूर्व पंतप्रधान इम्रान खान यांनी देखील त्यांना गैर-मुस्लिम म्हटलेलं आहे.

१९ च्या शतकाच्या शेवटी भारतात अहमदिया मुस्लिम या पंथाचा आरंभ झाला. मिर्झा गुलाम अहमद यांनी हा पंथ स्थापन केला. या पंथाचे लोक मोहम्मद पैगंबर यांच्या नंतर गुलाम अहमद यांना देखील प्रेषित मानतात. वास्तविक स्वरुपात मुस्लिम मोहम्मद पैगंबरांनाच अंतिम प्रेषित मानतात. परंतु अहमदिया मुस्लिमांच्या या धार्मिक भावनेमुळे त्यांना इतर मुस्लिमांचा रोष पत्करावा लागला आहे. मात्र इम्रान खान जरी अहमदिया यांच्या विरोधात असले तरी नवाज शरीफ यांनी अहमदियांना भाऊ म्हटले होते.

या धार्मिक युद्धात इतर अल्पसंख्याक यांच्यासोबत अहमदिया मुस्लिमांची लोकसंख्या कमी झाली आहे. पाकिस्तानात केवळ सुमारे ०.०९% म्हणजे १.६७ लाख एवढीच अहमदिया यांची लोकसख्या असून भारतात मात्र १० लाख अहमदिया मुस्लिम आढळून येतात. पाकिस्तानात आर्थिक मंदीच्या काळातही कट्टरपंथीय अल्पसंख्याकांवर अत्याचार करत आहेत आणि अहमदिया मुस्लिम यांना गैर-मुस्लिम म्हणजे काफिरांचा दर्जा मिळाल्यामुळे दिवसेंदिवस या सांप्रदायावरील हिंसा वाढत आहे. उद्या जर पाकमध्ये अराजकता माजली तर अहमदिया मुस्लिमांना पाकिस्तानात राहणं कठीण होऊ शकतं.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.