पर्यावरणात जे गिधाडांबरोबर झाले ते आपल्याला चिमणीबरोबर होऊ द्यायचे नसेल तर आताच पुढे येण्याची गरज आहे. मात्र जेव्हा जेव्हा चिमणी वाचवा असा विषय चर्चेला येतो, तेव्हा अनेकजण याकडे पाठ फिरवतात. यामुळेच सध्या चिमण्यांची संख्या कमी होत आहे. अनेक उद्यानांमध्ये शोभेची आणि विदेशी प्रजातीची झाडे असतात, त्यामुळे चिमण्या तेथे निवारा करू शकत नाहीत. तसेच शहरात कावळे आणि कबुतरांची वाढती संख्या हेदेखील चिमण्यांची संख्या घटण्यामागे एक कारण असल्याचे ‘इंडियन स्पॅरोमॅन’ म्हणून ओळख असलेले तथा नेचर फॉर एव्हर सोसायटीचे अध्यक्ष मोहम्मद दिलावर यांनी भीती व्यक्त केली.
मुंबई महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे, उपायुक्त (उद्याने) किशोर गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नेचर फॉर एव्हर सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उदयान आणि प्राणी संग्रहालय येथील पेंग्विन इमारत सभागृहामध्ये आयोजित कार्यशाळेत मोहम्मद दिलावर बोलत होते. या कार्यशाळेसाठी उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी, उप उद्यान अधीक्षक ज्ञानदेव मुंडे, ‘नरेडेको’चे प्रतिनिधी, ‘एन्व्हायरमेंटल’चे रॉबर्ट, तुषार देसाई यांच्यासह पर्यावरण तज्ज्ञ, अभ्यासक आणि पर्यावरणाचा अभ्यास करणारे विद्यार्थी उपस्थित होते.
जीवसृष्टीतील महत्त्वाचा घटक असलेल्या चिमणीसाठी मुंबईकरांनी अन्न, पाणी आणि निवारा या त्रिसूत्रीचा वापर करायला हवा. पूर्वी अगदी अंगण-खिडकीपर्यंत येणारी चिमणी शहरात दिसेनाशी झाली आहे. चिमणीसाठी घर आणि खिडकीसह मुंबईकरांनी हृदयाचीदेखील कवाडे खुली करावीत, असे आवाहन “इंडियन स्पॅरोमॅन” म्हणून ओळख असलेले तथा नेचर फॉर एव्हर सोसायटीचे अध्यक्ष मोहम्मद दिलावर यांनी केले.
(हेही वाचा मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा; ‘या’ भागात होणार पाणीकपात)
‘लोकांच्या सहभागाने चिमणीला अंगणात परत कसे आणता येईल’ या विषयावरील कार्यशाळेत पर्यावरण तज्ज्ञ दिलावर पुढे म्हणाले, चौकोनी कुटुंब पद्धतीत आपण दरवाजे खिडक्या बंद करून घरात बसतो. त्यामुळे चिमणीला आपल्या अंगणात घरटे करावे तरी कुठे आणि कसे असा प्रश्न पडतो. अनेक उद्यानांमध्ये शोभेची आणि विदेशी प्रजातीची झाडे असतात, त्यामुळे चिमण्या तेथे निवारा करू शकत नाहीत. तसेच शहरात कावळे आणि कबुतरांची वाढती संख्या हेदेखील चिमण्यांची संख्या घटण्यामागे एक कारण असल्याचे दिलावर म्हणाले.
यामुळे घटतेय चिमण्यांची संख्या…
दिलावर यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे चिमण्यांची संख्या का घटते, यावरही मार्गदर्शन केले. मोठमोठ्या इमारतींच्या बांधकामात वाढता काचेचा वापर, घरांच्या खिडक्यांनाही गजऐवजी काच, तसेच सार्वजनिक बगिचा आणि उद्यानांमधील वाढती शोभेची झाडे यामुळे शहरातील चिमण्यांची संख्या घटते आहे.
कसा वाढवू शकतो चिमण्यांचा वावर
मुंबईत अनेक मोठमोठ्या इमारतींच्या वाहनतळात चिमण्यांसाठी पर्यावरणपूरक घरटे टांगून चिमण्यांचा अधिवास वाढविण्यासाठी आपण मदत करू शकतो. याशिवाय सार्वजनिक बगीचे आणि उद्यानांमध्ये (पोडियम गार्डन) देखील चिमण्यांसाठी अन्न आणि पाणी ठेऊन आपण त्यांचा अधिवास वाढवू शकतो. यासह मुंबईकरांनी आपल्या हृदयाची कवाडे खुली केली तर येत्या ३ ते ४ वर्षांत मुंबईमध्ये चिमण्यांचा किलबिलाट आणखी वाढू शकतो, असा विश्वासही दिलावर यांनी व्यक्त केला.
चिमणी वाचली तर हे पक्षीही वाढतील..
मुंबईकरांनी चिमणी वाचविण्यासाठी पुढाकार घेतला तर चिमणीसह, मैना, बुलबुल, पोपट, साळुंखी अशा इतर पाखरांचीही संख्या वाढू शकते, असा विश्वासही दिलावर यांनी व्यक्त केला. कार्यक्रमात उपस्थित चिकित्सक मुंबईकरांनी चिमणीसाठी घरटे कसे असावे, पाणी ठेवताना भांडे कसे असावे, कोणत्या झाडांवर त्या अधिक येतात, अशा शंकांचेही दिलावर यांच्याकडून निरसन करून घेतले.
Join Our WhatsApp Community