का होत आहे लसींचा ‘तुटवडा’? सिरमच्या पुनावाला यांनी केला मोठा खुलासा!

सिरम निर्मित कोविशिल्ड या लसीच्या उत्पादनासाठी लागणारा कच्चा माल अमेरिका-युरोपकडून रोखण्यात आल्याचे सिरमचे सर्वेसर्वा अदर पुनावाला यांनी सांगितले आहे.

92

हद्दपार होण्याच्या मार्गावर असणा-या कोरोना राज्यात पुन्हा आपले हात-पाय पसरत आहे. त्यामुळे राज्यातील आरोग्य यंत्रणा ही तोकडी पडत आहे. त्यातच महाराष्ट्राला दिल्या जाणा-या लसींच्या पुरवठ्यावरुन केंद्र विरुद्ध राज्य असा नवा वाद रंगला आहे. राज्यात कोरोना लसींचा मोठा तुटवडा निर्माण झाल्याने, अनेक ठिकाणी लसीकरण केंद्रे बंद करण्यात आली आहेत. पण हे राजकारण रंगले असतानाच, लस निर्मितीत जगात भारताचे नाव उंचावलेल्या सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने आता लसींबाबत एक धक्कादायक माहिती दिली आहे. सिरम निर्मित कोविशिल्ड या लसीच्या उत्पादनासाठी लागणारा कच्चा माल अमेरिका-युरोपकडून रोखण्यात आल्याचे सिरमचे सर्वेसर्वा अदर पुनावाला यांनी सांगितले आहे.

(हेही वाचाः राष्ट्रपती, पंतप्रधान लसीकरणासाठी रुग्णालयात जातात, महाराष्ट्रातील नेते वेगळे आहेत का? उच्च न्यायालयाने फटकारले )

काय म्हणाले पुनावाला? 

सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या पुनावाला यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत याचा खुलासा केला. लसींचे उत्पादन वाढवण्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी हे सत्य उघड केले. त्यामुळे आता एकच खळबळ उडाली आहे. सध्या तात्पुरत्या काळासाठी आपल्याला जो लसींच्या तुटवड्याचा सामना करावा लागत आहे, तो याच कारणामुळे असल्याचे त्यांनी सांगितले. पण हा तुटवडा तात्पुरता आहे. पुढील काळात आपल्याला ही अडचण भासणार नाही, असेही त्यांनी सांगितले. त्यासाठी आपण इतर पुरवठादारांचा पर्याय शोधणार असल्याचे पुनावाला म्हणाले.

भारतीयांसाठी सेवा देणं हे आद्यकर्तव्य

भारत सध्या जगभरात लस पुरवणारा मोठा पुरवठादार आहे. पण सध्या भारतात रुग्णसंख्या ही पुन्हा एकदा वाढायला लागली आहे. त्यामुळे सध्या सिरमकडून जास्तीत-जास्त लसींचा पुरवठा हा भारतात होत असून, निर्यात कमी करण्यात आली आहे. या कारणाने जगातील इतर देश सिरम इन्स्टिट्यूटवर नाराज आहेत. पण भारतीयांसाठी सेवा देणं हे सिरमचे आद्यकर्तव्य आहे, असे पुनावाला यांनी स्पष्ट केले.

(हेही वाचाः राज्यात १५ लाख लसी शिल्लक! देवेंद्र फडणवीसांचा दावा )

टप्प्याटप्प्याने सर्वांना लसीकरण करणं योग्य

इतर देश सर्व वयोगटातील लोकांना लस देत आहेत मग अजून भारतात तसे का होत नाही, असा प्रश्न सध्या विचारण्यात येत आहे. पण भारताची लोकसंख्या ही इतर देशांपेक्षा कितीतरी पटींनी जास्त आहे. सध्या लसींचा तुटवडा असताना आता लगेच सर्वांना लस देण्याचा निर्णय घेणं, धोकादायक असल्याचे त्यांनी सांगितले. सरकार समाजातील प्रत्येक घटकाचा विचार करत पाऊले उचलत आहे. त्यामुळे टप्प्याटप्प्याने सर्वांसाठी लसीकरण मोहीम हाती घेणं, योग्य ठरेल असे मत पुनावाला यांनी मांडले.

लसींच्या गुणवत्तेत कुठेही कमी पडणार नाही

मला इच्छा आहे, स्वतः अमेरिकेला जावं आणि निषेध व्यक्त करून सांगावं की, तुम्ही भारत आणि जगातील इतर अनेक लस उत्पादकांसाठी कोवॅक्सिन आणि इतर लसींच्या उत्पादनासाठी आवश्यक असलेल्या कच्च्या मालाचा पुरवठा रोखून धरत आहात, अशी भावना पुनावाला यांनी व्यक्त केली. चीनच्या पुरवठादारांकडून सिरम कोणताही कच्चा माल घेत नाही. कारण त्यामध्ये गुणवत्ता आणि इतर काही गोष्टींचा अभाव असण्याची भीती आहे. आपल्याला लसींच्या गुणवत्तेच्या बाबतीत कोणतीही जोखीम उचलायची नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

(हेही वाचाः …तर मुंबईत शनिवारपासून लसीकरण पूर्णपणे ठप्प!)

लस उत्पादन वाढवण्याचे लक्ष्य

पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटमध्ये कोविशिल्ड लसीचे उत्पादन होत आहे. सिरम इन्स्टिट्यूट सध्या महिन्याला सहा- साडे सहा कोटी कोविशिल्ड लसींचं उत्पादन करत आहे. हे उत्पादन वाढवून महिन्याला १०-११ कोटी करण्याचे लक्ष्य आहे, असेही त्यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.