आमदार निधी, जिल्हा परिषद सेस निधी, जिल्हा नियोजन समितीमधील निधी असा विविध निधी एकत्रित करून दिव्यांगांना रोजगार देण्यासाठी, उद्योग सुरू करण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन ग्राम विकास व पंचायत राज राज्यमंत्री योगेश कदम (Yogesh Kadam) यांनी दिले.
दापोली पंचायत समितीतर्फे दापोली उपजिल्हा रुग्णालयात राज्यमंत्री कदम (Yogesh Kadam) यांच्या हस्ते दिव्यांग व्यक्तींच्या तपासणी शिबिराचे उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. दिव्यांगांना जिल्ह्याच्या ठिकाणी हेलपाटे मारायला लागू नयेत, शासन योजनेपासून वंचित राहायला लागू नये, यासाठी तालुक्याच्या ठिकाणी शिबिर घेऊन जागच्याजागी प्रमाणपत्र देण्यात आली आहेत. त्यामुळे केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी ते पात्र ठरले आहेत. दोशे किलोमीटर प्रवास करून रत्नागिरीत दिव्यांग प्रमाणपत्रासाठी जाणे शक्य होत नव्हते. अनेक दिव्यांग त्यापासून वंचित राहत होते. गेल्या पाच वर्षांपासून तालुक्याच्या ठिकाणी शिबिर घेत आहोत. या शिबिरातून २ हजार १७ जणांना जागेवरच दाखले मिळाले आहेत. अशा शिबिरांमधून दिव्यांगांना न्याय देण्यात यशस्वी झालो आहोत. दापोली, खेड, मंडणगडमधील दिव्यांग योजनांसाठी पात्र होणार आहेत, असेही ते म्हणाले.
(हेही वाचा – Tirupati लाडू घोटाळा प्रकरणी मोठी कारवाई; SIT कडून चौघांना अटक )
दिव्यांगांसाठी ज्या वस्तू लागणार असतील त्या त्यांना सीएसआर निधीमधून मिळवून दिल्या जातील. प्रमाणपत्राप्रमाणेच शस्त्रक्रिया करण्यासाठीही शिबिरांचे आयोजन केले जाईल. उपजिल्हा रुग्णालयामधील उणिवा दूर करण्यासाठी विशेषत: मनुष्यबळ, डॉक्टर्स उपलब्ध व्हावेत, यासाठी सार्वजनिक आरोग्य मंत्र्यांकडे माझा पाठपुरावा सुरु आहे, असेही कदम (Yogesh Kadam) म्हणाले. सध्याच्या दापोली उपजिल्हा रुग्णालयाच्या बाजूला सुरू असणाऱ्या नव्या इमारतीच्या बांधकामाबाबत आवर्जून उल्लेख करून राज्यमंत्री कदम (Yogesh Kadam) म्हणाले, ५० खाटांच्या रुग्णालयाची इमारत वर्षभरात उभी राहत नसेल, तर ही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसाठी नामुष्कीची बाब आहे. अधिकाऱ्यांनी गतीने उभ्या राहिलेल्या अन्य इमारतींच्या बांधकामाचा आदर्श घेऊन गतीने काम करावे. वेळेत काम पूर्ण करावे, अन्यथा कारवाईला सामोरे जावे, अशा शब्दांत त्यांनी इशारा दिला.
यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप, तहसीलदार अर्चना बोंबे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. पवन सावंत, माजी समाजकल्याण सभापती भगवान घाडगे, माजी सभापती चारुता कामतेकर आदी उपस्थित होते. यावेळी राज्यमंत्र्यांच्या हस्ते विजय मोरे, श्रद्धा देवघरकर, मनोज गावडे, दीपक जगदाळे आदींना प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community