नागपाडयातील मिर्झा गालिब रस्त्यांचे पदपथ शालेय मुलांसाठी!

115

नवीन संकल्पनेच्या आधारे पदपथांची सुधारणा व सुशोभिकरण करून शालेय मुलांसाठी अनुकूल वातावरण तयार करण्याचा प्रकल्प महापालिकेच्यावतीने हाती घेण्यात येत असून, याची सुरुवात नागपाडा येथील मिर्झा गालिब मार्गापासून होणार आहे. भायखळा नागपाडा येथील रस्त्यांच्या रुंदीकरणासह चौकांचेही सुशोभिकरण झाल्यानंतर, आता येथील रस्त्यांच्या पदपथांची सुधारणा शालेय मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून बनवण्यात येणार आहे. समाजवादी पक्षाचे स्थानिक नगरसेवक आणि महापालिका गटनेते रईस शेख यांच्या प्रयत्नातून या पदपथाची सुधारणा केली जात असून, बकाल रुप झालेल्या नागपाड्यांचा चेहरामोहराच बदलला जाणार आहे.

अंमलबजावणी करण्यात आली

मिर्झा गालिब मार्ग अर्थात क्लेअर रोड येथील पदपथ शालेय मुलांसाठी अनुकूल असा एक प्रकल्प डब्ल्यूआरआय इन्फ्रा थर्टी स्क्वेअर या नामवंत वास्तू विशारद व नगर रचनाकार कंपनीमार्फत तयार करण्यात आला आहे. महापालिकेच्या रस्ते विभागामार्फत हे काम हाती घेण्यात आले असून, स्थानिक नगरसेवक आणि गटनेते रईस शेख यांनी संबंधित कंपनीमार्फत  हा प्रोजेक्ट तयार करून घेतला होता. त्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

विशेषत: मुलांसाठी रस्ता

यासाठी महापालिकेने मागवलेल्या निविदेमध्ये मानसी कंस्ट्रक्शन ही कंपनी पात्र ठरली, असून या कंपनीच्यावतीने १ कोटी ६७ लाख रुपयांमध्ये ही कामे केली जाणार आहेत. हा रस्ता सर्व वापरकर्त्यांसाठी विशेषतः मुलांसाठी चालण्यासाठी सुयोग्य, सुरक्षित आणि चैतन्यदायी करण्याच्यादृष्टीने डिझाइन करण्यात आले होते. या प्रयत्नांचा भाग म्हणून कोन्स, बॅरिकेड्स, प्लँटर्स, खडू आणि पेंटचा वापर करून शाळेचा झोन निश्चित करण्यात आला आणि वाहतुकीला दिशा देण्यात आली, तिची रहदारी व वेगाचे नियमन करण्यात आले, रस्त्यावरील उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आणि चालण्यासाठी व रस्ता ओलांडण्याआधी थांबण्यासाठी जागा निश्चित केली गेली.

रस्ते सुरक्षित होतील 

रईस शेख यांनी यापूर्वी नागपाड्याच्या चौकांचे सुशोभिकरण केले होते, तसेच येथील रस्त्यांचे रुंदीकरणही केले होते. त्यामुळे नागपाड्याच्या विकासात मोठी भर पडली असून, आजवर नागपाड्याचा विकास कुणालाही करता आलेला नाही. परंतु समाजवादी पक्षाचे रईस शेख यांनी या विभागाचे प्रतिनिधीत्व केल्यानंतर, नागपाड्याच्या विकासाला चालना मिळाल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. रईस शेख यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी लोकांसाठी, विशेषतः मुलांसाठी सुरक्षित रस्त्यांची रचना केल्याने, येथील रस्ते सगळ्यांसाठीच सुरक्षित होतील. मुंबईतील सुरक्षित शाळा अर्थात सेफ स्कूल झोन प्रयोग हा भारतातील सर्व शहरांसाठी आदर्श प्रारुप ठरेल,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सर्वेक्षणात सकारात्मक प्रतिसाद

मुंबई महानगरपालिका आणि वाहतूक पोलीस यांनी वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट (डब्ल्यूआरआय), इंडिया रॉस सेंटर यांच्यासह ग्लोबल रोड सेफ्टीसाठी (जागतिक पातळीवर रस्ते सुरक्षा) ब्लूमबर्ग फिलान्थ्रॉपीजअंतर्गत सेफ स्कूल झोन प्रायोगिक तत्वावर सुरू केला. या अंतर्गत केलेल्या सर्वेक्षणात जवळपास १०० टक्के मुलांना रस्ते सुरक्षित आढळून आले. या प्रयोगाच्या आधी व नंतर ४० मुले, ४० पादचारी, २० व्यावसायिक आणि २० वाहनचालकांची मुलाखत घेण्यात आली.

( हेही वाचा: … तर दोन्ही जोड्यांनी मारा, किरीट सोमय्यांचं राऊतांना प्रतिआव्हान! )

स्थानिकांचेही सर्वेक्षण 

डब्ल्यूआरआय इंडियाच्या इंटिग्रेटेड ट्रान्सपोर्टचे व्यवस्थापक रोहित टाक यांच्या म्हणण्यानुसार “लघुकालीन उपाययोजना एक आठवडाभर राबविण्यात आल्या. या परिवर्तनाबाबत महत्त्वाचे भागधारक, विशेषतः मुले कशी प्रतिसाद देतात ते समजून घेण्यासाठी सर्वेक्षण महत्त्वाचे होते. स्कूल झोन डिझाइन प्रस्ताव निश्चित करण्याआधी मुलांसोबतच व्यावसायिक, वाहनचालक यांचा समावेश असलेल्या स्थानिकांचेही सर्वेक्षण करण्यात आले होते,असे ते म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.