पवई तलाव भरले, ‘मिठी’चा धोका वाढला

मिठीला पूर आल्यास कुर्ला एलबीएसस आणि कुर्ला क्रांती नगर आदी भागांना मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.

पवई तलाव कधी नव्हे ते एक महिना आधीच भरुन वाहिल्यामुळे, आता मुंबई समोरील मिठी नदीचा धोका अधिकच वाढला आहे. पवईचे ओसंडून वाहणारे पाणी मिठी नदीच्या पात्राला जाऊन मिळत असल्याने, मिठीच्या शेजारी राहणाऱ्या कुटुंबांना धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे एरव्ही जुलै महिन्यात मिठीचा धोका जाणवत असला, तरी आता जूनपासूनच येथील कुटुंबांना भीतीच्या छायेखाली जीवन जगावे लागणार आहे.

म्हणून आहे धोका

पवई तलाव शनिवारी दुपारीच ओसंडून भरुन वाहू लागला आहे. प्रत्येक वर्षी सरासरी जुलै महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्याात पवई तलाव भरुन वाहतो, यानंतर विहार तलाव भरले जाते. परंतु यंदा मागील वर्षीच्या तुलनेत २४ दिवस आधीच पवई तलाव भरुन वाहू लागला. पवईत तलावातील वाहून जाणारे पाणी मिठी नदीला जाऊन मिळते. त्यामुळे मुसळधार पाऊस, समुद्राची भरती आणि पवई तलावातील वाहून येणारे पाणी यामुळे मिठी नदीला पूर येऊन कुर्ला परिसरासह शहर भागांमध्ये पाणी तुंबून, मुंबई जलमय होण्याची भीती वर्तवली जात आहे. मिठीला पूर आल्यास कुर्ला एलबीएसस आणि कुर्ला क्रांती नगर आदी भागांना मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेच्या यंत्रणेला एक महिना आधीच कामाला लागावे लागणार आहे.

(हेही वाचाः जून महिन्यातच पवई तलाव भरला!)

तो उपाय अजून कागदावरच

मिठी नदीची धोक्याची पातळी ३.३ मीटर एवढी आहे. परंतु दोन वर्षांपूर्वी २.८ मीटर एवढी पातळी असतानाच, एलबीएस मार्गावर पाणी जमा होऊन आसपासच्या घरांमध्ये पाणी शिरले होते. त्यामुळे पवई तलाव भरल्याने एकप्रकारे आता कुर्लावासियांसाठी धोक्याची घंटा आहे. पवई तलाव, विहार तलाव व तुळशी तलाव आदींचे ओसंडून जाणारे पाणी मिठी नदीला येऊन मिळत असल्याने, हे पाणी मिठी नदीत न सोडता, ते भांडुप कॉम्प्लेक्समध्ये भूमिगत जलाशय बांधून त्यामध्ये सोडणे, तसेच ऐरोली येथील खाडीत वळते करणे, अशाप्रकारे या पाण्याचा निचरा करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला होता. त्याकरता अभ्यास करण्यासाठी सल्लागारही नेमले, परंतु दोन वर्षांनंतरही हे कागदावरच आहे.

मिठी नदीतील गाळ कंत्राटदारांनी काढलेलाच नाही. त्यातच आता पवई तलाव भरल्याने मिठी नदी भरुन, आसपासच्या लोकांना धोका निर्माण झाला आहे. मिठीची साफसफाई न झाल्याने आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, पर्जन्य जलवाहिनी विभागाचे प्रमुख अभियंता सर्वांना पत्र दिले असून, येत्या पावसाळ्यात एकप्रकारे कुर्लावासियांना पुरात बुडवण्याचाच प्रशासनाचा विचार दिसतोय, त्यामुळे अजूनही वेळ गेलेली नाही. मिठीची सफाई योग्यप्रकारे करुन घ्यावी, अन्यथा त्यांच्यावर कारवाई तरी करावी.

 

-कप्तान मलिक, नगरसेवक (राष्ट्रवादी काँग्रेस,कुर्ला)

 

(हेही वाचाः मुंबईत पावसाचा धुमाकूळ! )

पवई तलाव यंदा खूपच लवकर भरल्याने, निश्चितच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परंतु पवई तलाव, विहार आणि तुळशीचे वाहून येणारे पाणी मिठी नदीत न सोडता, ते भांडुप कॉम्प्लेक्समध्ये टाकी बांधून त्यात वळते करणे, तसेच ऐरोलीच्या नदीत सोडणे, यासाठी आम्ही मागील कित्येक वर्षांपासून प्रयत्न करत आहोत. पण प्रशासनाचे याकडे लक्ष नसून, पुन्हा एकदा २६ जुलैसारखी पूरपरिस्थिती निर्माण होण्याची वाट प्रशासन पाहत आहे का?

-डॉ.सईदा खान, नगरसेविका(राष्ट्रवादी काँग्रेस,कुर्ला)

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here