मुंबईत मागील पाच महिन्यांपासून महापालिका प्रशासनाने कोविड चाचण्यांची संख्या वाढवली असून डिसेंबर महिन्यात जिथे ५० टक्के चाचण्या केल्या जात होत्या, ते प्रमाण एप्रिलपर्यंत ६७ टक्यांवर नेण्यात आले आहे. त्यामुळे रुग्ण आढळून येण्याचे प्रमाणही वाढू लागले आहे. बाधित रुग्णांची टक्केवारी डिसेंबर महिन्यात जिथे ७ टक्क्यांवर होती, ती वाढून आता एप्रिल महिन्यात २३ टक्क्यांपर्यंत गेल्याचे आकडेवारीवरून पहायला मिळत आहे. त्यामुळे सध्याची रुग्ण संख्या ही वाढीव चाचण्यांच्या माध्यमातून समोर येणारी आकडेवारी आहे.
७०:३० प्रमाणात आरटीपीसीआर, अँटीजेन चाचणी केली जाते!
सार्वजनिक जागांवर कोविडचा फैलाव होवू नये म्हणून अँटीजेन चाचण्या करुन तातडीने निकाल प्राप्त करण्यात येत असले तरी अँटीजेन चाचण्यांचा वापर व्यापक प्रमाणावर होवू लागला, तेव्हापासूनच मुंबईत आरटीपीसीआर चाचण्यांचे प्रमाण महानगरपालिकेने सातत्याने वाढवत नेले आहे. कोविड चाचणी करुन तातडीने निष्कर्ष मिळणे क्रमप्राप्त असल्याने त्यासाठी अँटीजेन चाचणीच महत्त्वाची ठरते. या अँटीजेन चाचणीमध्ये निगेटिव्ह अहवाल मिळालेल्या परंतु लक्षणे दिसत असलेल्यांची पुढे जाऊन आरटीपीसीआर चाचणी केली जाते. मुंबई महानगरामध्ये शेजारील शहरांमधून, राज्यातील इतर भागांतून तसेच इतर राज्यांतूनही ये-जा करणारे नागरिक असतात. रोजगाराच्या निमित्ताने मुंबईत वास्तव्यास आलेली लोकसंख्या लक्षणीय आहे. ज्यावेळी असे नागरिक एका परिसरातून दुसऱ्या ठिकाणी ये-जा करतात, त्यावेळी त्यांची वैद्यकीय निकषांनुसार तपासणी करून टेस्टिंग किटचा प्रभावी व सुयोग्य वापर करण्यात येतो. त्यासाठी आयसीएमआर आणि सरकार यांच्या निर्देशानुसारच ७०:३० या प्रमाणात आरटीपीसीआर व अँटीजेन चाचणी केली जात आहे. मागील डिसेंबर महिन्यात केलेल्या एकूण चाचण्यांमध्ये आरटीपीसीआर चाचण्यांची टक्केवारी ही ५०.३६ टक्के होती, पण हे प्रमाण एप्रिल २०२१ रोजी ६७.८७ टक्के एवढे होते. तसेच या आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये आढळून आलेल्या बाधित रुग्णांची टक्केवारी ही डिसेंबर २०२०मध्ये ७.१२ टक्के एवढी होती, ते प्रमाण एप्रिल २०२१ रोजी २३ टक्के एवढे आढळून आले.
(हेही वाचा : राज्यात कोरोना रुग्ण संख्या घटते, तरी नवीन जिल्ह्यांत लॉकडाऊनची घोषणा! )
एकूण चाचण्यांमध्ये आरटीपीसीआर चाचण्यांची टक्केवारी
- डिसेंबर २०२० मध्ये ५०.३६ टक्के
- जानेवारी २०२१ मध्ये ६५.३१ टक्के
- फेब्रुवारी २०२१ मध्ये ७४.२३ टक्के
- मार्च २०२१ मध्ये ६७.२४ टक्के
- एप्रिल २०२१ मध्ये ६७.८७ टक्के
आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये आढळलेल्या बाधितांची टक्केवारी
- डिसेंबर २०२० मध्ये ७.१२ टक्के
- जानेवारी २०२१ मध्ये ५.३९ टक्के
- फेब्रुवारी २०२१ मध्ये ५.३३ टक्के
- मार्च २०२१ मध्ये १५.४८ टक्के
- एप्रिल २०२१ मध्ये २३.४३ टक्के