लसीकरणाच्या संदेशानंतरच घराबाहेर पडा!  महापौरांचे जनतेला आवाहन

सद्यस्थितीत १५ मे २०२१ पर्यंत लसीकरणाचा दुसरा डोज घेणाऱ्यांना प्राधान्य देण्यात येत असल्याचे महापौरांनी सांगितले.

78

कोविडच्या लसीकरण केंद्रांच्या ठिकाणी नागरीक थेट गेल्यास त्यांना लसीकरण केले जाईल, असे आवाहन महापालिका प्रशासनाच्यावतीने करण्यात आलेले असताना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी कोविन ॲपवर नोंदणी झाल्यानंतर संबंधित लसीकरण केंद्राकडून लघुसंदेश प्राप्त झाल्याशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन केले. त्यामुळे लसीकरणाबाबत महापौर आणि प्रशासनाकडून वेगवेगळी आवाहने केली जात असल्याने नक्की ऐकावे तरी कुणाचे, असा प्रश्न नागरीकांना पडला आहे.

लसीच्या उपलब्धतेची खातरजमा केल्यानंतरच घराबाहेर पडा!

कोविन ऍपवर लसीकरणासाठी यशस्वी नोंदणी केलेल्या नागरिकांनी लसीकरणाच्या दिनांकाची वाट न पाहता नजीकच्या रुग्णालयांमध्ये थेट जावून लस घ्यावी, तसेच नोंदणी केली नसेल तरीही नजीकच्या रुग्णालयात जावून नोंदणी करावी व तेथे लस घ्यावी, असे आवाहन मुंबई महापालिका प्रशासनाने २० मार्च २०२१ रोजी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले होते. परंतु गुरुवारी कांजूर पूर्व, भांडुप पश्चिम आणि गोरेगाव नेस्को येथील लसीकरण केंद्राच्या पाहणीनंतर महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना, कोविन ॲपवर नागरिकांनी लसीकरणाची नोंदणी केल्यानंतर संबंधित लसीकरण केंद्राकडून लघुसंदेश प्राप्त झाल्यानंतरच तसेच लसीची उपलब्धता याची खातरजमा केल्यानंतरच नागरिकांनी घराबाहेर पडणे योग्य राहील, असे सांगितले. हे सांगताना त्यांनी उन्हाळ्याचे उदाहरण दिले. सद्यस्थितीत उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना उष्माघाताचा त्रास होऊ शकतो, ही खबरदारी घेऊनच नागरिकांनी घराबाहेर पडावे, असे आवाहनही महापौरांनी यावेळी केले.

(हेही वाचा : लसीकरण केंद्राच्या उद्घाटनावरून राजकारण!)

सद्यस्थितीत लसीकरणाचा दुसरा डोज घेणाऱ्यांना प्राधान्य

सद्यस्थितीत लसीकरण केंद्रांवर नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करीत असून यामुळे कोरोनाचा प्रार्दुभाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. महानगरपालिका नवीन लसीकरण केंद्र सुरू करण्याबाबत नियोजन करीत असून नागरीकांनी मुंबई महानगरपालिकेला सहकार्य करणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे. प्रशासन व नागरिक यांच्यामध्ये सुसंवाद असेल तरच लसीकरण केंद्रावर नागरिकांचा गोंधळ होणार नाही, असे आवाहनही महापौरांनी केले आहे. त्यासोबतच राज्यशासनाकडून १८ ते ४४ वयोगटातील लसीकरणाबाबतची तारीख जाहीर झाल्यानंतर याबाबतचे नियोजन करण्यात येईल, असेही महापौरांनी सांगितले. सद्यस्थितीत १५ मे २०२१ पर्यंत लसीकरणाचा दुसरा डोज घेणाऱ्यांना प्राधान्य देण्यात येत असल्याचे महापौरांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.