महिला पोलिसाने युवकाला रेल्वे स्थानकावर झोडपले!

बुधवारी सोशल मीडियावर मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला.

61

मुंबईच्या हार्बर रेल्वे मार्गावरील वडाळा रेल्वे स्थानकाच्या फलाटावर एका विद्यार्थ्याला एका महिला कॉन्स्टेबलने काठीने चोप देत असल्याचा व्हिडियो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडियो मागील सत्य जाणून घेण्यासाठी वडाळा रेल्वे पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक वृषाली कावनपुरे यांच्याशी संपर्क साधला.

‘तो’ विद्यार्थी महिला डब्यातून प्रवास करत होता!

त्यांनी दिलेल्या माहितीनुसार आक्रम हमीद खान हा तरुण १० जुलै रोजी हार्बर मार्गावरील शिवडी येथून वडाळाच्या दिशेने ट्रेनमधून महिला डब्याच्या शेजारच्या डब्यातून प्रवास करीत होता. दरम्यान आक्रमच्या हातात एका बॉटल होती व तो सतत ती बॉटल तोंडाला लावून महिला डब्यात कर्तव्यावर असणारी महिला शिपाई गावकरकडे बघून विचित्र हावभाव करीत असल्यामुळे पोलिस शिपाई गावकर यांनी त्याला ट्रेनमधून उतरण्यास सांगितले, मात्र तरीही तो ऐकत नसल्याचे बघून गावकर यांनी वडाळा रेल्वे स्थानकांवरील पोलिस कर्मचारी यांच्या मदतीने त्याला वडाळा स्थानकावर उतरवले. त्याला फलाटावर उतरवून पोलिस शिपाई गावकर यांनी जाब विचारला असता उद्धटपणे उत्तरे देऊ लागल्यामुळे गावकर यांनी त्याला दोन-तीन काठ्या लगावून वडाळा रेल्वे पोलिस ठाण्यात आणले. दरम्यान रेल्वे पोलिसांनी मुंबई पोलिस कायद्यानुसार त्याच्यावर कारवाई करून त्याला समज देऊन सोडून देण्यात आले असल्याची माहिती पोलिस निरीक्षक वृषाली कावनपुरे यांनी दिली आहे.

सोशल मीडियातून टीका!

मात्र बुधवारी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या मारहाणीच्या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर पोलिसांच्या या कृत्याचा निषेध केला जात असून समाजातून वेगवेगळी प्रतिक्रिया उमटत आहे. या व्हायरल व्हिडिओची दखल घेण्यात आली असून चौकशी सुरु असल्याचे पोलिस सूत्रांकडून समजते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.