मागील वर्षी कोरोनाचा कहर सुरू झाल्याने महिलांना पर्यावरणाची आठवण झाली आणि त्यांनी वडाच्या तोडलेल्या फांद्या विकत आणण्याऐवजी कागदावरच वडाचे चित्र रेखाटून पर्यावरण पुरक वटपोर्णिमा साजरी केली. परंतु यंदा कोरोनाची तीव्रता कमी झाल्यामुळे आणि निर्बंध शिथिल केल्यामुळे, पुन्हा एकदा बाजार भरू लागले आहेत. विशेष म्हणजे मागील वर्षी जिथे वडाच्या तोडलेल्या फांद्या घेण्यास कुणी तयार नव्हते, तिथे आता पाच ते दहा रुपये मोजून वडाच्या फांद्या विकत घेण्यासाठी महिलांची झुंबड उडाली आहे. त्यामुळे कोरोना ओसरल्यानंतर त्यांचे पर्यावरणावरील प्रेमही ओसरले का, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.
फांद्यांच्या खरेदीसाठी गर्दी
वटपौर्णिमेसाठी वडाच्या झाडांच्या फांद्या मोठ्या प्रमाणात तोडल्या जातात. मागील वर्षी कोरोनामुळे एकत्रित जमा होऊन वडाच्या झाडाला फेऱ्या मारुन त्याची पूजा करणे शक्य नसल्याने, महिलांनी घरच्या घरी कागदावर वडाच्या झाडाचे चित्र रेखाटून पूजा केली हेाती. परंतु मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कोरोनाच्या नियमांमध्ये शिथिलता आणली गेली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बाजार भरू लागले असून, ठिकठिकाणी वडाच्या तोडलेल्या फांद्यांची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. त्याचबरोबर वटपौर्णिमेकरता आवश्यक असलेल्या फणस, आंबा, करवंद, जांभळे आदी वस्तूंचीही विक्री केली जात आहे. मात्र ही विक्री करताना कुठल्याही प्रकारे विक्रेत्यांकडून सोशल डिस्टन्स राखले जात नसून, ग्राहकही या नियमांचे पालन करताना दिसत नाहीत.
(हेही वाचाः प्लास्टिक पिशव्यांबाबत पर्यावरण मंत्र्यांची हाताची घडी, तोंडावर बोट!)
पर्यावरणाचा पडला विसर
यंदा वडाच्या पूजेसाठी मोठ्या संख्येने जमणे नियमांनुसार बंद असल्याने, बहुतांशी महिलांचा वडाच्या फांद्या विकत घेऊन त्याची पूजा घरच्या घरी करण्यावर भर आहे. त्यामुळे वडाच्या फांद्यांची विक्री जोरात झालेली आहे. मात्र, मागील वर्षी ज्या महिलांनी कागदावर वडाचे चित्र काढून आणि कागदाची पाने बनवून सण साजरा केला होता, त्याच महिलांना यंदा निर्बंध शिथिल झाल्यानंतर पर्यावरणाचाही विसर पडलेला पहायला मिळत आहे. मात्र, काही महिला या पर्यावरणाचा विचार करणाऱ्या असून, त्यांच्याकडून कोरोना नियमांचेही पालन होत आहे. त्यामुळे त्यांनी मागील वर्षीप्रमाणेच वडाच्या झाडाची प्रतिकृती रेखाटून वटपौर्णिमा साजरा करण्याचा निर्धार केला आहे.
हे प्रमाण अल्प असून कोरोना आणि पर्यावरण यांचा विचार करता महिलांकडून वडाच्या झाडाची प्रतिकृती रेखाटूनच सण साजरा व्हायला हवा, असे वैद्यकीय आणि पर्यावरणवाद्यांचे म्हणणे आहे. तसेच जर वडाच्या फांद्याची पूजा होणार असेल तर तीच फांदी एका कुंडीत लावली जावी आणि प्रत्येक वर्षी त्या फांदीची पूजा केली जावी, अशीही सूचना काही वृक्षप्रेमींकडून केली जात आहे.
(हेही वाचाः कोरोनामुळे अनाथ झालेला विद्यार्थ्यांची शैक्षणिक जबाबदारी घेतली सरकारने! )
Join Our WhatsApp Community