मुंबईतील मोगरा नाल्यावरील पंपिंग स्टेशनचे काम लवकरच

हे काम २० महिन्यांमध्ये पूर्ण केले जाणार असल्याचे विभागाने स्पष्ट केले.

मागील अनेक वर्षांपासून रखडलेल्या मोगरा नाल्यावरील पावसाळी पाण्याचा निचरा तथा उपसा करणाऱ्या उदंचन केंद्राचे अर्थात पंपिंग स्टेशनचे काम आता मार्गी लागणार आहे. या पंपिंग स्टेशनच्या बांधकामासंदर्भात असलेली निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्याने, पुढील सर्व मंजुरीसाठी स्थायी समिती पुढे सादर करण्यात आला आहे. या पंपिंग स्टेशनमुळे अंधेरी ते जोगेश्वरी रेल्वे स्टेशन परिसर, मालपा डोंगरी ते वर्सोवा परिसरात होणा-या पूर परिस्थितीवर नियंत्रण मिळवता येणार आहे. पण मोगराच्या पंपिंग स्टेशनच्या कामाचा मार्ग मोकळा झाला असला, तरी माहुल पंपिंग स्टेशन अजूनही जमीन ताब्यात घेण्याच्या प्रक्रियेतच अडकले आहे.

कंत्राटदाराची शिफारस 

ब्रिमस्टोवॅड अहवाल आणि चितळे समितीच्या शिफारशीनुसार मुंबईमध्ये एकूण आठ ठिकाणी पावसाळी पाण्याचा उपसा करणारी पंपिंग स्टेशन बनवण्याचा निर्णय घेतला होता. या आठपैकी हाजीअली, ईला, लव्हग्रोव्ह, क्लिव्हलँड, ब्रिटानिया आणि गझदरबंध या सहा उदंचन केंद्रांची कामे पूर्ण होऊन ती कार्यान्वित झाली आहेत. परंतु मोगरा व माहुल या दोन ठिकाणच्या पर्जन्यजल पंपिंग स्टेशनचे काम बाकी होते. परंतु आता मोगरा नाला येथील जागेचा प्रश्न मिटल्यानंतर याठिकाणी पंपिंग स्टेशन उभारण्यासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण करुन, कंत्राटदाराची शिफारस प्रशासनाने केली आहे.

(हेही वाचाः अग्निशमन सेवा शुल्काची आकारणी : प्रशासनाला चूक भोवणार)

असे होणार काम

मोगरा पंपिंग स्टेशन काम हे नाल्यामध्येच केले जाणार असून, सध्या अस्तित्वात असलेल्या या नाल्यातील पाण्याचा प्रवाह सुरळीत ठेऊनच हे काम केले जाणार आहे. या केंद्राची क्षमता ४२ हजार लिटर प्रति सेकंद एवढी आहे. भरतीच्या वेळी समुद्राचे पाणी नाल्याद्वारे शहरामध्ये येऊ नये, म्हणून नाल्याच्या प्रवाहामध्येच प्रतिबंधक दरवाजे बसवले जाणार आहेत. तसेच नाल्यातून वाहून येणारा कचरा समुद्रामध्ये जाण्यापासून रोखण्यासाठी स्वयंचलित स्क्रीनही लावली जाणार असल्याचे पर्जन्य जल विभागाने स्पष्ट केले आहे.

या कंपन्या ठरल्या पात्र

पंपिंग स्टेशन उभारण्यास सर्व प्रकारची यांत्रिक कामे करुन कार्यान्वित करणे, तसेच पुढील सात वर्षांकरता देखभालीच्या कंत्राटाचा समावेश असून, यासाठी मागवलेल्या निविदेतील पात्र कंत्राटदाराची शिफारस करुन प्रस्ताव मंजुरीकरता स्थायी समितीकडे संबंधित विभागाने पाठवला आहे. हे काम मिशिगन इंजिनिअर्स व म्हाळसा कंस्ट्रक्शन या कंपन्यांनी संयुक्त भागीदारीत मिळवले असून, पंपिंग स्टेशनची उभारणी व पुढील सात वर्षांची देखभाल यासाठी ३३०.१२ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. तसेच हे काम २० महिन्यांमध्ये पूर्ण केले जाणार असल्याचे विभागाने स्पष्ट केले.

(हेही वाचाः सात रस्त्याच्या चौकातील उद्यानाचे होणार सौंदर्यीकरण!)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here