बोरीवली रेल्वे स्थानक ते संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला जोडणारा पूलच वादात अडकला

बोरीवली रेल्वे स्थानक पूर्व ते संजय गांधी राष्ट्रीय उद्यानापर्यंत विना अडथळा सहज चालता यावे म्हणून याठिकाणी स्कायवॉक बांधण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. या स्कायवॉकचे काम सुरू झाले होते, परंतु याला दुकानदारांनी केलेल्या विरोधानंतर हे कामच महापालिकेने बंद केले असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे बोरीवलीतील प्रस्तावित स्कायवॉकचे अर्थात पादचारी पुलाचे काम रखडले गेले असून या पुलाचे काम रद्द करण्यात आल्याने वादात अडकले आहे.

पुलाचे काम रद्द

मुंबई महापालिकेच्या माध्यमातून बोरीवली पूर्व रेल्वे स्थानक ते राष्ट्रीय उद्यानापर्यंत (नॅशनल पार्क) स्कायवॉकच्या धर्तीवर पादचारी पूल बांधले जात आहे. त्यामुळे येत्या तीन वर्षात हे पादचारी पूल बांधण्यासाठी डिसेंबर २०२१मध्ये स्थायी समितीच्या मंजुरीने कंत्राटदाराची निविड करण्यात आली होती. त्यानुसार महापालिकेच्या पूल विभागाने कंत्राटदाराच्या माध्यमातून काम सुरु केले होते. परंतु याला दुकानदारांचा विरोध झाल्याने हे काम थांबण्याचे निर्देश महापालिका प्रशासनाने दिले आहेत. काम सुरु झाल्यानंतर केवळ तात्पुरते काम स्थगित करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या असल्या तरी प्रत्यक्षात हे पूल होऊ नये यासाठीच प्रशासनावर दबाव असल्याने प्रशासनाच्यावतीने हे काम पुढे सुरू केले जात नसल्याची माहिती प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून मिळत आहे.

( हेही वाचा : वरळीत कोण ठरणार आदित्य ठाकरेंचे लाडके…)

या स्कायवॉकचा लाभ बोरीवली पूर्व रेल्वे स्थानक व प्रादेशिक परिवहन आगारातील प्रवाशी, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात येणारे पर्यटक, शाळा व व्यावसायिक कार्यालयीन कर्मचारी इत्यादींना होणार असल्याने या पुलाचे काम हाती घेण्यात आले होते. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात एक तर पर्यटकांना चालत जावे लागते किंवा रिक्षाच्या माध्यमातून ते जात असतात. परंतु वाहतूक कोंडी आणि रस्त्यांवर उभ्या करण्यात येणाऱ्या वाहनांमुळे पर्यटकांना मोठ्या दिव्यांतून जावे लागत आहे. तसेच येत्या काही दिवसांमध्ये मेट्रो रेल्वे सुरु होणार असल्याने रेल्वे आणि मेट्रो रेल्वे प्रवाशांना जोडणारे हे पूल ठरणार आहे. रेल्वे स्थानकावर उतरणाऱ्या प्रवाशांना मेट्रो स्थानकावर जाण्यासाठी हा महत्वाचा मार्ग ठरणार या पुलाचा पर्याय निवडण्यात आला होता. परंतु हे काम अर्धवट स्थितीच बंद करण्यात आल्याने स्थानिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण पसरले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here