सातारा येथील कराड भागात ऊसाच्या शेतात ऊस तोडणी कामगारांना तीन दिवसांपूर्वी मांजरीची दोन पिल्ले आढळली. पिल्लांच्या शरीराचा रंग आणि काळ्या रेषा पाहून कामगारांनी त्यांना पाळण्याचे ठरवले. तीन दिवस गाय-म्हशीचे दूध पाजल्यानंतर आपण घरात पाळायला आणलेली पिल्ले मांजरीची नसून वाघाटी या जंगलात राहणा-या मांजरीची असल्याचे कामगारांच्या लक्षात आले. याबाबतीत माहिती मिळताच सातारा वनविभाग (प्रादेशिक)च्या वनाधिका-यांनी वाघाटींना उपचारांसाठी पुणे येथील रेस्क्यू या खासगी प्राणीप्रेमी संस्थेकडे उपचारांसाठी मंगळवारी सायंकाळी पाठवले.
वनाधिका-यांसमोर आव्हान ठरले
वाघाटी ही मांजर जंगलात राहणा-या मांजरींपैकी जगातील सर्वात लहान मांजर आहे. पूर्ण वाढ झालेल्या वाघाटीचे वजन जेमतेम दीड किलो असते. चार दिवसांपूर्वी कामगारांनी शेतात सापडलेले वाघाटीचे दोन पिल्लू घरात आणले. तीन दिवस घरात ठेवल्यानंतर दोन्ही पिल्ले मांजर नसल्याने कामगारांनी वनाधिका-यांना संपर्क केला. तीन दिवस पिल्ले आईपासून दूर राहिल्याने अंदाजे दीड महिन्यांची पिल्लांना सांभाळणे वनाधिका-यांसमोर आव्हान ठरले. वाघाटींच्या उपचारांसाठी त्यांना पुणे येथील रेस्क्यू या खासगी प्राणीप्रेमी संस्थेकडे दिल्याची माहिती सातारा (प्रादेशिक) वनविभागाचे उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांनी दिली. वाघाटींच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांना नैसर्गिक अधिवासात मुक्त केले जाईल, असेही ते म्हणाले.
(हेही वाचा चीनच्या वेबसाईट केल्या हॅक, ‘बोलो पावभाजी’ चर्चेत)
Join Our WhatsApp Community