विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाची गोडी लागावी. नेहमीच्या वापरातील विजेची उपकरणे कशी कार्य करतात, याविषयी सोप्या भाषेत माहिती मिळावी, याकरिता ‘फन विथ इलेक्ट्रॉनिक्स’ या दोन दिवसीय विनामूल्य कार्यशाळेचे (Workshop) आयोजन स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातर्फे करण्यात आले होते.
इयत्ता सातवी ते नववीमध्ये शिकणारे विद्यार्थी या कार्यशाळेत सहभागी झाले होते. विद्युत उपकरणे कशी तयार होतात, त्यांचे कार्य कसे चालते याविषयी त्यांना माहिती देण्यात आली. उदा. रोजच्या वापरातील एलईडी बल्ब, बॅटरी, सेन्सर, डीसी मोटर, स्विचचे प्रकार, सोलर सेल इत्यादींबद्दल सोप्या भाषेत माहिती देण्यात आली.
प्रत्येक विद्यार्थ्याला विनामूल्य विद्युत किट
विद्यार्थ्यांना प्रयोग करण्याकरिता मोफत विद्युत किट देण्यात आले. त्यामध्ये कटर, बॅटरी, वायर्स, काही इलेक्ट्रॉनिक्स वस्तू होत्या. जेणेकरून मुलांना एखादा प्रयोग करून बघावासा वाटल्यास मुले करू शकतील. डॉ. तुषार देसाई यांनी विद्यार्थ्यांना फन विथ इलेक्ट्रॉनिक्स कार्यशाळेत सोप्या भाषेत मार्गदर्शन केले. गेली अनेक वर्षे ते विद्यार्थ्यांना या विषयाबाबत मार्गदर्शन करत आहेत.
विद्युत उपकरणे हाताळण्याची संधी
लहानपणापासूनच मुले प्रकाश, ध्वनी आणि हालचालींकडे आकर्षित होत असतात. या उपकरणांच्या कार्याविषयी मुलांना सोप्या भाषेत माहिती व्हावी. त्यांचे कार्य कसे चालते, याबाबतही त्यांच्या मनात कुतूहल असते. शाळेत प्रयोगशाळेत या उपकरणांविषयीचे ज्ञान विद्यार्थ्यांना होते,मात्र काही उपकरणे स्वत:च हाताळली की, त्यांचे कार्य कसे चालते हे विद्यार्थ्यांच्या लक्षात यावे, याकरिता विद्यार्थ्यांना स्वत:च्या हाताने विद्युत उपकरणे हाताळण्याची संधी या कार्यशाळेत मिळाली.
तंत्रज्ञानाबाबत आवड आणि जागरुकता
एकूण ६ तासांच्या दोन दिवसीय कार्यशाळेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना इलेक्ट्रॉनिकचे मूलभूत घटक उदा. एलईडीचे विविध प्रकार आणि संयोजन, बॅटरी, सोलर सेल, ट्रान्झिस्टर आणि आयसीसारख्या विविध सेमीकंडक्टर उपकरणे हाताळण्याची संधी देण्यात आली. याशिवाय विद्युत उपकरणे दुरुस्त करणे आणि त्यांची निर्मिती करणे या विषयाबाबत या छोट्या प्रयोगांच्या माध्यमातून मुलांमध्ये आत्मविश्वास, तंत्रज्ञान विषयाबाबत जागरूकता आणि स्वारस्य निर्माण व्हायला मदत होईल, असे मत कार्यशाळेचे आयोजक श्रीपाद काळे यांनी व्यक्त केले तसेच विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळाल्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातर्फे पुन्हा फन विथ कार्यशाळेचे आयोजित करू, असेही ते म्हणाले.
हेही वाचा –