कर्करोग हे जागतिक स्तरावर मृत्यूचे दुसरे प्रमुख कारण आहे. कर्करोगामुळे २०२० मध्ये अंदाजे ९.९ दशलक्ष मृत्यू झाले आहेत, असा धक्कादायक खुलासा जागतिक आरोग्य संघटनेने केला आहे. २०१० ते २०१९ या काळात कर्करोगाच्या मृत्यूमध्ये २१ टक्के वाढ झाल्याचे निरीक्षण जागतिक आरोग्य संघटनेच्या शास्त्रज्ञांनी नोंदवले. या काळात जागतिक कर्करोगाच्या घटनांमध्ये २६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तंबाखू सेवन, अल्कोहोलचा वापर, कमी फळे आणि भाज्यांचे सेवन आणि शारीरिक हालचालींचा अभाव यामुळे जगभरात कर्करोगाच्या मृत्यूंपैकी अंदाजे एक तृतीयांश मृत्यू होतात, असेही जागतिक आरोग्य संघटनेच्यावतीने सांगण्यात आले.
मौखिक कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग याबाबतीत जागतिक स्तरावर वैद्यकीय क्षेत्रातून चिंता व्यक्त केली जात आहे. २०२० साली मौखिक कर्करोगामुळे जागतिक पातळीवर ७.४ टक्के मृत्यू झाल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली. या दोन्ही कर्करोगांमध्ये मौखिक कर्करोगाच्या केसेसमध्ये प्रतिबंध होण्यासाठी भारतात राष्ट्रीय कर्करोग नियंत्रण योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. मात्र गर्भाशयाच्या कर्करोगाबाबत नियंत्रण आणण्यासाठी देशपातळीवर काम होणे गरजेचे असल्याचे मत कर्करोगतज्ज्ञ देतात. गर्भाशयाच्या कर्करोगावर भूतान, मालदीव, म्यानमार, श्रीलंका आणि थायलंड या देशांत राष्ट्रव्यापी एचपीव्ही प्रतिबंधात्मक लसीकरण सुरु आहे. बांग्लादेश, भारत आणि तिमोर-लेस्टे या देशांत याबाबतच्या योजना सुरु असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेकडून दिली गेली. गर्भाशयाचा कर्करोग प्रतिबंधित करण्यासाठी प्रत्येक देशाने ९० टक्के किशोरवयीन मुलींना गर्भाशय प्रतिबंधात्मक लसीकरण द्यावे, अशी सूचना जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे.
Join Our WhatsApp Community