पर्यावरण संवर्धनाकरिता समुद्रकिनारे कचरामुक्त होणे अतिशय गरजेचे आहे. याकरिता आज ‘जागतिक स्वच्छता दिन : 2023’ निमित्त मुंबईतील माहीम रेती बंदर येथे समुद्रकिनारा स्वच्छता मोहिमेचे ‘प्ले अँण्ड शाइन फाउंडेशन’ या संस्थेतर्फे मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आले.
200 पेक्षा जास्त स्वयंसेवक या मोहिमेत सहभागी झाले होते. सर्व स्वयंसेवकांनी संघटित होऊन माहीम रेती बंदरावरील विस्तीर्ण समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता केली. समुद्रकिनाऱ्यावर साचलेला विविध प्रकारचा कचरा गोळा केला. समुद्रकिनारे हा पर्यावरणाचाच एक भाग आहे. त्यामुळे समुद्रकिनारे कचरामुक्त आणि स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न केले, तर समुद्रकिनारी भेट देणाऱ्या नागरिकांना, पर्यटकांना आनंददायी वातावरणाचा आनंद घेता येऊ शकतो. मुंबईतीलही सुंदर समुद्रकिनारे आहेत. त्यांची स्वच्छता राखली, तर आपल्याला स्थानिक ठिकाणीसुद्धा पर्यटनाचा आनंद घेता येऊ शकतो. या उद्देशाने प्ले अँण्ड शाइन फाऊंडेशनचे संस्थापक सार्थक वाणी यांनी जागतिक स्वच्छता दिनानिमित्त समुद्रकिनारा स्वच्छता मोहिमेचे आयोजन केले होते.
या मोहिमेसंदर्भात माहिती देताना प्ले अँण्ड शाइन फाउंडेशनचे संस्थापक सार्थक वाणी म्हणाले की, माहीम बंदर समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता करून आम्ही फक्त सामूहिक शक्तीच दाखवली नाही, तर प्रत्येकाने ही स्वच्छता एक मार्मिक आठवण म्हणूनही आज काम केले. स्वयंसेवकांच्या प्रयत्नांमुळे सर्वांना स्वच्छ आणि आरोग्यदायी वातावरण येथे निर्माण होईल. या विचारामुळे स्वच्छता मोहिमेत सहभागी झालेल्या स्वयंसेवकांनाही प्रेरणा मिळाली.
मोहिमेत सहभागी झालेल्या स्वयंसेवकांप्रती संस्थापक वाणी यांनी आभार मानले तसेच आपण एकत्रितरित्या, संघटित होऊन काम करून समाजात सकारात्मक बदलही घडवून आणू शकतो तसेच इतरांना या कार्यात सामील करून घेण्यासाठीही प्रोत्साहित करू शकतो. येणाऱ्या पिढ्यांसाठी भविष्यात स्वच्छ, हिरवेगार जगाची निर्मिती करून देण्यास तसेच पर्यावरण जागरूकता आणि संवर्धनाकरिता ‘प्ले अँण्ड शाइन फाउंडेशन’ कडून सतत प्रयत्न होतील, अशी खात्रीही यावेळी त्यांनी दिली.
हेही पहा –