World Rabies Day : भटक्या श्वानांचे २८ सप्टेंबर २०२४ पासून अँटी रेबीज लसीकरण

647
World Rabies Day : भटक्या श्वानांचे २८ सप्टेंबर २०२४ पासून अँटी रेबीज लसीकरण
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

जागतिक रेबीज दिनाच्या (World Rabies Day) निमित्ताने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने २८ सप्टेंबर २०२४ पासून संपूर्ण मुंबई महानगरातील भटक्या श्वानांचे अँटी रेबीज लसीकरण करण्याच्या मोहिमेला सुरुवात होणार आहे. महानगरपालिकेच्या सर्व प्रशासकीय विभागांमध्ये (वॉर्ड) या लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात येत आहे. श्वानांच्या चाव्यामुळे होणाऱ्या रेबीज या प्राणघातक रोगासंदर्भात जनजागृती व्हावी, या उद्देशाने जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीने दरवर्षी २८ सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय रेबीज दिनाचे आयोजन केले जाते. लसीकरण झालेल्या श्वानांसंबंधीत माहिती नोंदवण्यासाठी यंदा ऑनलाइन अॅप्लिकेशन तयार करण्यात आले आहे. या ऑनलाइन अॅप्लिकेशनमध्ये संबंधित श्वानासंबंधीत आकडेवारी छायाचित्रासह उपलब्ध असेल.

प्राणी कल्याण करणे व त्यासोबतच प्राण्यांपासून मानवामध्ये होणारे संक्रमण टाळण्यासाठी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी आणि अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, उप आयुक्त (विशेष) चंदा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबविले जात आहेत. श्वानांच्या चाव्यामुळे होणाऱ्या रेबीज या प्राणघातक रोगापासून बचाव तसेच ‘रेबीज मुक्त मुंबई’ करण्याच्या उद्देशाने संपूर्ण मुंबई महानगरामध्ये अँटी रेबीज लसीकरण हा आणखी एक उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

(हेही वाचा – CM Eknath Shinde यांच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया; शिर्डीच्या दौऱ्यासह अनेक कार्यक्रम रद्द)

श्वानांच्या चाव्यामुळे होणाऱ्या रेबीज या प्राणघातक रोगासंदर्भात जनजागृती व्हावी, या उद्देशाने जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीने दरवर्षी २८ सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय रेबीज दिनाचे (World Rabies Day) आयोजन केले जाते. ‘रेबीजचे सीमोल्लंघन’ (ब्रेकिंग रेबीज बॉर्डर्स) ही यंदाच्या आंतरराष्ट्रीय रेबीज दिनाची संकल्पना आहे. याच पार्श्वभूमीवर, महानगरपालिकेच्या पशूवैद्यकीय आरोग्य विभागाच्या वतीने यूथ ऑर्गनायझेशन इन डिफेन्स ऑफ अॅनिमल्स, यूनिव्हर्सल अॅनिमल वेल्फेअर सोसायटी आणि उत्कर्ष ग्लोबल फाऊंडेशन या संघटनांच्या सहकार्याने अँटी रेबीज लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. २८ सप्टेंबर २०२४ रोजी या लसीकरण मोहिमेस सुरुवात होऊन सर्व भटक्या श्वानांचे लसीकरण पूर्ण होईपर्यंत (साधारणपणे मार्च २०२५ पर्यंत) ती सुरू राहील.

२०१४ च्या आकडेवारीनुसार, मुंबई महानगरात सुमारे ८७ हजार भटके श्वान आहेत. या आकडेवारीसह दरम्यानच्या काळात वाढलेले भटके श्वान, अशा सर्व श्वानांचे लसीकरण या मोहीम अंतर्गत करण्यात येणार आहे. लसीकरण करण्यात आलेल्या भटक्या श्वानाला चिन्हांकित केले जाईल. तसेच त्यांची संपूर्ण माहिती छायाचित्रांसह भौगोलिक माहिती प्रणालीवर (जीआयएस) आधारित https://vhd.mcgm.gov.in/register-grievance ऑनलाइन अॅप्लिकेशनवर नोंदवण्यात येईल. त्यामुळे, लसीकरणासंदर्भात वास्तविक माहिती उपलब्ध होऊ शकेल, असे मुंबई महानगरपालिकेच्या पशूवैद्यकीय आरोग्य विभागाचे महाव्यवस्थापक डॉ. कलीमपाशा पठाण यांनी सांगितले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.