महापालिका मुख्यालयासमोरील सेल्फी पॉईंटवर महिलांप्रती अशीही कृतज्ञता

दरवर्षी ८ मार्च रोजी जगभरात महिला दिन साजरा केला जातो. याच जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागाने महानगरपालिका मुख्यालया समोरील ‘सेल्फी पॉईंट’वर अनोख्या पद्धतीने कृतज्ञता व्यक्त केली आहे‌. यामध्ये सुमारे ५०० गुलाब आणि ५०० शेवंतीसह डेझी आणि जिप्सोफीला या फुलांचा वापर करून हृदयाची आकर्षक प्रतिकृती तयार करण्यात आली आहे.

ही प्रतिकृती तयार करण्यासाठी वापरण्यात आलेली बहुतांश फुले ही महापालिका उद्यानांमधील आहेत. तसेच तयार करण्यात आलेली प्रतिकृती ही तब्बल ८ फूट उंचीची आणि ५ फूट लांबीची आहे. ही प्रतिकृती तयार करण्यासाठी सुमारे ५०० पेक्षा अधिक गुलाब आणि तेवढ्याच संख्येतील शेवंतीच्या फुलांचा वापर करण्यात आला आहे. तर डेझी आणि जिप्सोफिला या फुलांचे प्रत्येकी १० गुच्छ यासाठी वापरण्यात आल्याची माहिती उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली आहे. महिलांप्रती हृदयापासून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तयार केलेली ही प्रतिकृती महिला दिनाच्या निमित्ताने दिवसभर व संध्याकाळी उशिरापर्यंत ‘सेल्फी पॉईंट’वर असणार आहे, अशी माहिती जितेंद्र परदेशी यांनी दिली आहे.

(हेही वाचा तुर्कीने काश्मीर मुद्यावरून भारताला केले लक्ष्य; सोशल मीडियात संताप, काय म्हणतात नेटकरी?)

काय आहे गुलाब आणि शेवंतीचे महत्व?

गुलाब 

गुलाबाचे फुल हे जगभरात प्रेमाचे प्रतीक म्हणून ओळखले जाते‌. संपूर्ण जगभरात गुलाबाच्या एक हजाराहून अधिक प्रजाती असून‌‌ त्यांची दरवर्षी लागवड केली जाते. ‘सेल्फी पॉईंट’ करता वापरण्यात आलेली फुले ही गुलाबी रंगाची असून गुलाबी रंगाचे गुलाब हे कृतज्ञता व प्रशंसेचे प्रतीक मानले जाते.

शेवंती

शेवंतीचे फुले ही निष्ठा, आशावाद व आनंदाचे प्रतीक मानली जातात. ही फुले पूजेकरिता व मंदिरात मोठ्या प्रमाणात वापरली जात असल्याने या शेवंतीच्या फुलांना धार्मिक महत्त्वही आहे. त्याचबरोबर शेवंतीची फुले ही फुलांच्या माळा, हार,‌ गजरे, वेणी बनविण्यासाठीही वापरण्यात येतात.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here