वरळी बीडीडी चाळीतील गॅस सिलिंडरमध्ये भाजलेल्या पुरी कुटुंबातील चार महिन्यांच्या बाळानंतर त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला होता. परंतु आता त्यापाठोपाठ त्या बाळाच्या आईनेही सोमवारी शेवटचा श्वास घेतला. या घटनेतील त्यांच्या पाच वर्षांच्या बाळावर उपचार सुरु असून भावासह आई आणि वडिलही गेल्याने हे बाळ अनाथ झाले आहे.
नायर रुग्णालयामध्ये डॉक्टरांची दिरंगाई
वरळीतील बीडीडी चाळीमध्ये ३० नोव्हेंबर रोजी झालेल्या सिलिंडर स्फोटामध्ये भाजलेल्या पुरी कुटुंबाला वेळीच उपचार प्राप्त झाले नाही. समाज माध्यमात व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सर्वच स्तरांमधून चीड व्यक्त करण्यात येत होती. नायर रुग्णालयामध्ये भाजलेल्या दोन बाळांसह त्यांच्या आई-वडिलांना दाखल करण्यात आले असता उपस्थित डॉक्टर व नर्स यांनी कोणतेही प्राथमिक उपचार केले नव्हते. त्यामुळे महापालिकेच्या रुग्णालयातील उपचार आणि व्यवस्थापनाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
(हेही वाचा महापालिका सभा पुन्हा ऑनलाईनच्या मार्गाकडे?)
एकापाठोपाठ एक मृत्यू झाले
या घटनेनंतर १ डिसेंबर रोजी दाखल झालेल्या चार महिन्यांच्या मंगेश पुरी याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर गंभीररित्या भाजलेल्या २७ वर्षीय त्याचे वडील आनंद पुरी यांचा मृत्यू ४ डिसेंबर रोजी झाला. सोमवारी कस्तुरबा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाळाची आई विद्या पुरी (२५) यांचा सायंकाळी पाच वाजता मृत्यू झाला. तर पाच वर्षीय बाळ विष्णू पुरी याची प्रकृती स्थिर असल्याचे कस्तुरबा रुग्णालयातील डॉक्टरांनी स्पष्ट केले. विष्णू पुरी हा १५ ते २० टक्के भाजला होता. दरम्यान, या प्रकरणी नेमलेल्या चौकशी समितीचा अहवाल येत्या मंगळवार किंवा बुधवारी प्राप्त होणे अपेक्षित असून त्यानंतर महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून पुढील कारवाई डॉक्टर तसेच संबंधित कर्मचाऱ्यांवर केली जाणार आहे.
Join Our WhatsApp Community