जुहू येथील अनधिकृत बांधकामाविरोधातील मोहीम मुंबई महानगरपालिकेने तीव्र केली आहे. जुहू चर्च मार्गावरील ‘व्हाईस ग्लोबल तपस बार’ ने केलेल्या अंदाजे ३ हजार ५०० चौरस फुटाच्या वाढीव आणि अनधिकृत बांधकामावर महानगरपालिकेच्या वतीने बुधवारी (१० जुलै २०२४) कारवाई करण्यात आली. येथील स्वयंपाकघर, तळमजला आणि बंदिस्त छतावरील वाढीव, अनधिकृत बांधकामावर हातोडा टाकण्यात आला. विशेष म्हणजे ही कारवाई पूर्व नियोजित असली तरी या बार मध्ये वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपीने मद्यपान केल्याची माहिती समोर आल्यानंतर या बार मधील कारवाई करण्यात आली. त्यामुळे महापालिका वाढीव आणि अनधिकृत बांधकामांवर अशी घटना होण्यापूर्वी कधी कारवाई करणार आहे की नाही असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे. (Worli Hit and Run)
मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या निर्देशानुसार, अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सहआयुक्त (परिमंडळ-४) विश्वास शंकरवार आणि के पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त चक्रपणी अल्ले यांच्या नियंत्रणाखाली अनधिकृत बांधकामांविरोधात कठोर कारवाई करण्यात येत आहे. जुहू चर्च मार्गावर किंग्ज् इंटरनॅशनल हॉटेलजवळील ‘व्हाईस ग्लोबल तपस बार’ ने वाढीव, अनधिकृतपणे बांधकाम केल्याचे निदर्शनास आले आहे. तळमजल्यावरील सुमारे दीड हजार चौरस फुटाच्या मोकळ्या जागेत लोखंडी शेड घालून त्याचा अनधिकृतपणे वापर, छतावर सुमारे दोन हजार चौरस फुट लोखंडी शेड टाकून छत बंदिस्त केल्याचे आढळले. (Worli Hit and Run)
(हेही वाचा – Worli Hit and Run : वरळी सी लिंकवर मिहीर शहाने नाखवांना पुन्हा चिरडलं; सीसीटीव्हीमधून संतापजनक माहिती समोर)
त्यानुसार, अतिक्रमण निर्मुलन पथकाने अंदाजे ३ हजार ५०० चौरस फूट क्षेत्रफळाचे बांधकाम बुधवारी १० जुलै २०२४ रोजी हटवले. महानगरपालिकेचे ५ अभियंते, २ अधिकारी, २० कामगार अशा मनुष्यबळासह १ जेसीबी संयंत्र, इलेक्ट्रिक ब्रेकर्स, गॅस कटर्स आदी संसाधनांच्या सहाय्याने ही कारवाई करण्यात आली. यावेळी पुरेसा पोलिस बंदोबस्त तैनात होता. तसेच, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारीही या कारवाईवेळी उपस्थित होते. महापालिका अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या हॉटेलमधील वाढीव आणि अनियमित बांधकामात विरोधात यापूर्वीच नोटीस बजावण्यात आली होती. या नोटीस नुसार कारवाई करण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू होती. त्यानुसार बुधवारी कारवाई करण्यात आली. दरम्यान, जुहू आणि परिसरामध्ये अशाप्रकारे निर्माण झालेली अनधिकृत बांधकामे पूर्णपणे हटवेपर्यंत ही मोहीम सुरूच राहील, असे मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात येत आहे. (Worli Hit and Run)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community