महाराष्ट्रातील रेल्वे स्थानकांवर किंवा रेल्वेत इंग्रजी, हिंदी भाषेबरोबरच मराठी भाषेचा वापर केला जातो. मात्र अनेकदा रेल्वेत मराठीचे वाभाडे काढले जातात. याचीच पुनरावृत्ती मध्य रेल्वेवर झाली आहे. स्थानकांच्या नावांचा चुकीचा उल्लेख केला जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबतची पोस्ट सध्या फेसबुकवर व्हायरल होत आहे.
वसई ते पनवेल मार्गावरील कामण हे रेल्वे स्थानक आहे. याच रेल्वे स्थानकाचे नाव इंग्रजीत Kaman असे लिहिले जाते. मात्र रेल्वेत या स्थानकाचा कामण ऐवजी कमना असा उच्चार केला जातोय. शिवाय कमाण असे दर्शनी फलकावरही लिहिले जात आहे. याचप्रमाणे खारबाव या रेल्वे स्थानकाच्या नावाचा उच्चार करताना आणि दर्शनी फलकावर नाव लिहितांना होत आहे. त्यामुळे आता मराठी भाषाप्रेमींकडून याबाबत संताप व्यक्त केला जात आहे.
फेसबुक पोस्टमध्ये काय लिहिलंय?
मध्य रेल्वेचे अगाध मराठी…
बुधवारी २२ मार्चला वसई ते पनवेल या गाडीने प्रवास केला. दुपारी १२.१० ला ही गाडी वसईहून सुटते. या गाडीत रेल्वे स्थानकाच्या नावाची घोषणा करताना तसेच गाडीतील दर्शनी फलकावर त्या नावाची जी काही वाट लावली होती ती पाहून आणि ऐकून कपाळावर हात मारून घेतला.
मध्य रेल्वेकडे मराठी भाषेचा किमान अभ्यास असणारे कोणीही अभ्यासू, जाणकार अधिकारी नाहीत की महाराष्ट्रात आपण मराठीची कितीही आणि कशीही वाट लावली तरी आपले कोणी काही वाकडे करू शकत नाही, इतका आत्मविश्वास मध्य रेल्वेच्या प्रशासनाला आहे आणि म्हणूनच अशी चूक केली जाते?
वसई ते पनवेल या मार्गावर ‘कामण’ हे रेल्वे स्थानक आहे. इंग्रजीत हे नाव KAMAN असे लिहिले जाते. गाडीत घोषणा करताना ‘कामण’ चा उच्चार ‘कमान’ असा केला जात होता. तर दर्शनी फलकावरही ‘कमाण’ असे चुकीचे लिहिले होते. हाच प्रकार ‘खारबाव’ या रेल्वे स्थानकाच्या नावाचा उच्चार करताना आणि दर्शनी फलकावर नाव लिहितांना झाला. दर्शनी फलकावर ‘खारबाव’ हे नावही ‘खरबाव’ असे चुकीचे लिहिले होते. – शेखर जोशी
Join Our WhatsApp Community