मागील तीन चार दिवसांपासून सुरु झालेल्या पावसानं पिकांना जीवदान दिलं आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, आजही राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.आज कोकणासह मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर पावसाचा ‘येलो अलर्ट’ देण्यात आला आहे.
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, यामध्ये कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे,तर उर्वरित राज्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.पावसाला सुरुवात झाल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.पाण्याअभावी पीकं माना टाकू लागली होती.अशा पिकांना आता जीवदान मिळणार आहे.राज्यातील मुंबईसह ठाणे, पालघर परिसरात जोरदार पावसानं हजेरी लावली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुतांश भागात पावसानं दमदार हजेरी लावली आहे. गेल्या महिन्याभरापासून पाठ फिरवलेल्या पावसाचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुन्हा आगमन झाले आहे. त्यामुळे कडकडीत उन्हाने शेतातील पिकं करपू लागल्याने चिंताग्रस्त बनलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. पुढील दोन दिवस हवामान खात्याकडून पावसाचा इशारा देण्यात आला असून जिल्हा प्रशासनाकडून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर जिल्ह्यात आतापर्यंत 2,531 मिमीच्या सरासरीने पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. पावसाच्या पुनरागमनाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
नंदुरबार जिल्ह्यात जोरदार पाऊस
गेल्या महिनाभरापासून दडी मारलेल्या पावसानं गेल्या तीन दिवसापासून नंदुरबार जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली आहे. संपूर्ण जिल्ह्यात सर्वत्र पाऊस होत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये समाधान दिसून येत आहे. दमदार पावसामुळं सातपुड्यातील अनेक नदी नाल्यांना पूर आला आहे. जोरदार पावसामुळे पिकांना काही अंशी जीवदान मिळाल्याची स्थिती आहे. जिल्ह्यातील धरणातील पाण्याच्या पातळीत अजूनही वाढ झाली नसल्याने जिल्ह्यात दमदार अशा पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community