सौ. यमुना विनायक सावरकर (माई) यांच्या स्मरणार्थ स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक आणि नंदादीप समिती यांच्यावतीने ‘स्मरण त्या तिघींचे’ या कार्यक्रमाचे प्रतिवर्षी आयोजन केले जाते. यावर्षी येसूवहिनींच्या (Yesubai Savarkar) त्यागाचे आणि निस्सिम राष्ट्रप्रेमाचे स्मरण होण्यासाठी ‘मी… येसूवहिनी’ या हृद्य सांगीतिक अभिवाचनाचे आयोजन दि. ८ डिसेंबर रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातील सावरकर सभागृहात करण्यात आले. यावेळी स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे (Manjiri Marathe) यांनी पाहुण्यांचा परिचय करून देत कार्यक्रमाची संकल्पना सांगितली. नंदादीप समितीच्या शुभदा लिमये यांच्या हस्ते कार्यक्रमातील कलाकारांचा ‘हिंदुत्व’ हे पुस्तक आणि सावरकरांची प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला.
( हेही वाचा : Markadwadi ही पवार, जानकरांची मक्तेदारी नाही; बावनकुळेंनी मांडली मतदानाची आकडेवारी)
यावेळी नंदादीप समितीबद्दल स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे म्हणाल्या की, ४ डिसेंबर १८८८ रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पत्नी यमुनाबाईंचा जन्म झाला आणि ८ नोव्हेंबर १९६३ ला त्यांचे निधन झाले. त्यानंतर काही भगिनींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांची भेट घेऊन माईंच्या स्मरणार्थ पुतळा किंवा स्मारक उभारावे, अशी इच्छा व्यक्त केली. मात्र स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणाले की, पुतळे उभारण्यापेक्षा हिंदूंसाठी (Hindu) काहीतरी भरीव कार्य करा. त्यानंतर सावरकरांनी सांगितल्याप्रमाणे लीलाताई आगाशे, सुमतीबाई पटवर्धन, विमल जोगळेकर, मंदाकिनी घमंडे, कृष्णाबाई दिवेकर या पाच भगिनींनी एकत्र येऊन १९६४ मध्ये ‘नंदादीप समिती’ची स्थापना केली. तेव्हा सावरकर म्हणाले होते की, यमुनाबाईंच कार्य तुम्ही लक्षात ठेवाच, पण येसूवहिनींच्या कार्याचेही स्मरण तुम्ही ठेवले पाहिजे. त्यानंतर नंदादीप समितीने अनेक कामे केली. परंतु पुढे वयपरत्वे अनेक भगिनींना समितीसाठी काम करणे शक्य होईना, त्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात (Swatantryaveer Savarkar Rashtriya Smarak) नंदादीप समिती विलीन करण्यात आली. त्या समितीद्वारे यमुनाबाईंच्या स्मरणार्थ होणारा कार्यक्रम स्मारकातर्फे प्रतिवर्षी घेतला जातो. त्याअंतर्गत आपण आज ‘मी… येसूवहिनी’ या हृद्य सांगीतिक अभिवाचनाचे आयोजन केले आहे, असे मंजिरी मराठे म्हणाल्या.
भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात सावरकर कुटुंबाचे नाव नेहमीच आदराने घेतले जाते. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर (तात्याराव), (Swatantryaveer Savarkar) गणेश दामोदर सावरकर (बाबाराव) आणि डॉ. नारायण दामोदर सावरकर (बाळ) या त्रिवर्ग सावरकर बंधूंनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या आयुष्याचं मोल दिलं. हे तीनही क्रांतिसूर्य तेजाने तळपत असले, तरी या तिघांच्याही मागे अगदी प्रथमपासून एक वीरांगना कायम खंबीरपणे उभी होती आणि ती म्हणजे सौ. सरस्वतीबाई ऊर्फ यशोदा गणेश सावरकर म्हणजेच स्वातंत्र्यवीर सावरकरांची लाडकी परमआदरणीय येसूवहिनी ! (Yashoda Ganesh Savarkar)
या अभिवाचनातील सुरुवातीच्याच एका ओळीने प्रेक्षकांची मने जिंकली ती ओळ म्हणजे, “क्रांतिकारकाच्या कथा होतात आणि त्यांच्या कुटुंबियांच्या व्यथा, मात्र येसूवहिनींच्या व्यथेची वीररसाने ओतप्रोत भरलेले कथा झाली… आणि तिचं कथा आम्ही तुमच्यासमोर सादर करत आहोत.” ‘मी… येसूवहिनी’ ही समिधा, पुणे यांची प्रस्तुती आहे. त्यात संगीता ठोसर यांनी केवळ तंबोऱ्यांच्या साथीने सावरकरांच्या आणि इतरांच्या कविता, गीते उत्तमरित्या सादर केली. संजय गोखले यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या भूमिकेला आणि विनोद पावशे यांनी बाबाराव सावरकरांच्या भूमिकेला योग्य न्याय दिला. तसेच सूत्रधार आणि अभिवाचक म्हणून दिलीप ठोसर यांनीही कलाकारांना उत्तम साथ दिली. त्याचबरोबर संहिता लेखनांमागची प्रेरणा आणि भूमिका डॉ. चित्रलेखा पुरंदरे यांनी सांगितली. त्यांच्या लेखनातून प्रेक्षकांच्या डोळ्यासमोर सावरकर कुटुंबियांची कथा आणि व्यथा जिवंत उभी राहिली. तर वीणा गोखले यांनी अभिवाचनातून येसूवहिनींचे दु:ख, त्यांचा त्याग प्रभावीपणे प्रेक्षकांसमोर मांडला. या कार्यक्रमाला राष्ट्रप्रेमींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community