आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या औचित्याने व महानगरपालिकेच्या पुढाकाराने बुधवारी २१ जून २०२३ मुंबई महानगरात विभागनिहाय योग शिबिरे घेण्यात आली. यामध्ये महापालिका मुख्यालयात चक्क दुपारी साडेबाराच्या सुमारासच योगाचे शिबिर आयोजित केले होते. त्यामुळे योगाचे शिबिर हे सकाळी भरणे आवश्यक असताना प्रत्यक्षात महापालिका मुख्यालयात दुपारी हे शिबिर आयोजित केल्याने महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी औपचारिकता म्हणून हे शिबिर भरवत यात सहभागी झाले होते की काय असा सवाल उपस्थित होत आहे. या योग शिबिरांमध्ये आबालवृद्धांसह हजारो नागरिकांनी सहभाग घेतला. या शिबिरांमधून मुंबईकरांना नियमित योग करण्याचे फायदे, व्यायामाचे महत्त्व आणि आरोग्यदायी जीवनशैली कशी आत्मसात करावी, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. मुंबई महानगरातील सर्व २४ विभागांमध्ये आणि विविध उद्याने, मैदाने, शाळा, वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालये इत्यादी विविध ठिकाणी बुधवारी पहाटेपासून आयोजित करण्यात आलेल्या योग शिबिरांमध्ये नागरिकांनी उत्फूर्तपणे सहभाग नोंदविला. त्यामुळे एकाबाजुला पहाटे आणि सकाळी योग शिबिर आयोजित केले जात असताना महापालिका मुख्यालयात चक्क दुपारच्या जेवणापूर्वी योगाचे शिबिर भरवल्याने आणि त्यात महापालिकेच अधिकारी सहभागी झाल्याने इतर कर्मचाऱ्यांकडूनच आश्चर्य व्यक्त केले जात होते.
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त महानगरपलिकेच्या मुख्यालयातही योग शिबिर घेण्यात आले. यावेळी उप आयुक्त (वित्त) रामदास आव्हाड यांनी योग शिबिरात सहभागी झालेल्या पुरुष व महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांना योगसाधनेचे महत्त्व पटवून दिले. तसेच शिबिरात सहभागी झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांनी शिर्षासनासह इतर आसनांचे प्रात्यक्षिक करून दाखविले. करोना काळात त्यांना योगासनांच्या झालेल्या फायद्याबाबत आव्हाड यांनी उपस्थितांना आवर्जून माहिती दिली. या योग शिबिरात डोंबिवली येथील योग शिक्षिका नंदिनी देशमुख, स्वाती कुळकर्णी (लेखा अधिकारी, पा.पु.म.नि.) यांनी देखील योगासने करून दाखविली व मार्गदर्शन केले. यावेळी प्रमुख लेखापाल (पापुमनि) पांडुरंग गोसावी यांच्यासह मुख्यालयातील महिला आणि पुरुष कर्मचारी उपस्थित होते. महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाने आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त बुधवारी विविध उपक्रम राबविले.
मुंबई महानगरातील २४ विभागातील शिव योग केंद्रांमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग विषयक प्रशिक्षण व मार्गदर्शन देण्यात आले. या वर्षीची आंतराष्ट्रीय योग दिनाची मध्यवर्ती संकल्पना ही “मानवतेसाठी योग” अशी होती. विभाग स्तरावरील शिव योग केंद्रांमध्ये तसेच विविध उद्यांनामध्ये, शाळांच्या पटांगणात ही योग शिबिरे घेण्यात आली. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित या कार्यवाहींचे समन्वयन हे ‘फिट मुंबईचे’ समन्वयक तथा सहायक आयुक्त विश्वास मोटे यांनी केले. महानगरपालिकेच्या ‘ए’ विभागात सहायक आयुक्त शिवदास गुरव यांनी उपस्थित नागरिकांना योग दिनाचे महत्त्व पटवून दिले. ‘ए’ विभागातील मरीन ड्राइव्ह येथे समुद्र किनारी मुंबईकरांनी योगाभ्यास केला. ‘बी’ विभागात मध्येही शिव योग केंद्रामध्ये योगसाधना करण्यात आली. ‘सी’ विभागात सहायक आयुक्त उद्धव चंदनशिवे यांच्या उपस्थितीत नागरिकांनी योग शिबिरात सहभाग घेतला. यावेळी नागरिकांना नियमित योग केल्याचे फायदे विषद करण्यात आले. ‘डी’ विभागात सहायक आयुक्त शरद उघडे यांनीही नागरिकांसोबत बुधवारी सकाळी योग शिबिरात सहभाग घेतला.
(हेही वाचा – राज्यातील युवतींना मिळणार स्वसंरक्षणाचे धडे; गुरुपौर्णिमेपासून ‘राजमाता जिजाऊ युवती स्वसंरक्षण कार्यक्रम’ सुरू होणार)
‘ई’ विभागात सहायक आयुक्त अजयकुमार यादव, ‘के’ पूर्व विभागात सहायक आयुक्त मनिष वळंजू, संयुक्त कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. (श्रीमती) दक्षा शहा यांनीही योग शिबिरात सहभाग घेत नागरिकांना मार्गदर्शन केले. उप आयुक्त संगिता हसनाळे (परिमंडळ १), अभिनेत्री अमृता संत, अभिनेत्री आदिती सारंगधर यांनी मुंबईकरांसह योग शिबिरांमध्ये सहभाग नोंदविला. ‘आर’ दक्षिण विभागात परिमंडळ सातच्या उप आयुक्त भाग्यश्री कापसे, सहायक आयुक्त ललित तळेकर यांनी नागरिकांना योग आणि व्यायामाचे महत्त्व पटवून देत नियमित योगाभ्यास करण्याचे आवाहन केले. ‘एस’ विभागात सहायक आयुक्त महेश शिंदे यांनी मुंबईकरांसह योग शिबिरात सहभाग नोंदविला. ‘एफ’ उत्तर विभागात ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’च्या माध्यमातून योग शिबिर घेण्यात आले. यावेळी सहायक आयुक्त चक्रपाणी आर. अल्ले उपस्थित होते. तसेच ‘एन’ विभागाच्यावतीने ‘आर सीटी’ मॉलमध्ये बुधवारी योग शिबिर घेण्यात आले.
या शिबिरात आमदार राम कदम यांनीदेखील सहभाग नोंदवत योगाभ्यास केला. तसेच ‘पी’ दक्षिण विभागात सहायक आयुक्त राजेश अक्रे आणि ‘के’ पश्चिम विभागात जुहू चौपाटीवर सहायक आयुक्त डॉ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थिती नागरिकांनी योग शिबिरात सहभाग नोंदविला. महानगरपालिकेच्या के. ई. एम. रुग्णालयात प्रभारी अधिष्ठाता डॉ. हरिश पाठक यांच्या मार्गदर्शनात योग शिबिर घेण्यात आले. या शिबिरात शिक्षक, विद्यार्थी आणि रुग्ण सहभागी झाले. शीव येथील लोकमान्य टिळक सर्वोपचार रुग्णालयात प्रमुख अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांच्या मार्गदर्शनात व उपस्थितीत योग शिबिर घेण्यात आले. नायर दंत रुग्णालयात ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ तर्फे योगाभ्यासावर आधारित व्याख्यान आयोजित करण्यात आले. विलेपार्ले येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय व डॉ. रु. न. कूपर रुग्णालयात देखील आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात डॉक्टर, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. तसेच वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्याने आणि प्राणिसंग्रहालय येथे संचालक डॉ. संजय त्रिपाठी आणि उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांच्यासह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी उद्यानात योगासने केली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community