डोंबिवली: घाईघाईत लोकल पकडण्यासाठी गेला अन् जीव गमावला

178

रेल्वे गाडी व फलाटातील अंतराकडे लक्ष द्या, अशी रेल्वे प्रशासनाकडून दररोज उद्घोषणा केली जाते. मात्र काही प्रवाशी याकडे लक्ष देत नसल्याने त्यांना आपला जीव गमविण्याची वेळ येते. घाईघाईत रेल्वे गाडी पकडण्याच्या नादात एका तरुणाचा रेल्वे गाडी व फलाटमध्ये अडकून जागीच जीव गेल्याची घटना गुरुवारी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास डोंबिवली फलाट क्रमांक ४वर घडली.

याबाबत रेल्वे पोलिसांकडून मिळलेल्या माहितीनुसार, ओमकार नितीन बळे (वय २३) असे मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे. डोंबिवली फलाट क्रमांक ४वर ११.३३ वाजता कर्जत लोकल आली असल्याचे ओमकारने पाहिले. मात्र या लोकल मधून जायचे असल्याने ओमकारने रेल्वे पुलाच्या पायऱ्या उतरुन घाई घाईत लोकल पकडण्याचा प्रयत्न केला. पण लोकल सुरू झाल्याने ओमकारने डब्ब्यात जाण्यासाठी पाय टाकला असता त्याचा अंदाज चुकला. त्याचा पाय फलाट आणि गाडीमधील रिकाम्या जागेमध्ये पडला. ओमकार त्यात अडकल्याने लोकलची धडक लागली. यातच त्याचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची नोंद डोंबिवली रेल्वे पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

बुधवारी डोंबिवली रेल्वे पुलावर प्रवाशाला मारहाण

दरम्यान बुधवारी सायंकाळच्या सुमारास क्षुल्लक कारणावरून एका प्रवाशाला रेल्वे पुलावर दोघांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी डोंबिवली लोहमार्ग पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे.

माहितीनुसार, सागर भिसे हा प्रवासी अंबरनाथ फास्ट लोकलने घाटकोपर येथून प्रवास करत डोंबिवली रेल्वे स्थानकात उतरला. मात्र रेल्वे पुलावर प्रवाशांची गर्दी असल्याने सागरचा पाय एका प्रवाशाच्या पायाला लागला. सागर त्या प्रवाशांची क्षमा मागून पुढे गेला. तरीही रागाच्या भरात दोघा प्रवाशांनी पुढे जाऊन सागरला अडवले. तू पाय का मारला? तुला दिसत नाही का? अशा शब्दात सागरला दोघांनी जाब विचारला. क्षमा मागितली असून वाद नको असे सागर त्या दोघांना म्हणाला. मात्र दोघांनी सागरशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. वादाचे रुपांतर हाणामारी होऊन सागर व दोघा प्रवाशांमध्ये रेल्वे पुलावरच मारामारी सुरू झाली. यावेळी रेल्वे पुलावर प्रवाशांची गर्दी जमली होती. याची माहिती डोंबिवली रेल्वे पोलिसांना मिळताच पोलीस पुलावर धावत आले. या प्रकरणी सागरने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

(हेही वाचा – मोठी बातमी: मध्य रेल्वेच्या लोकलला आग; प्रवाशांनी काढला पळ)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.