भारतात कार्य उत्पादकता जगात सर्वात कमी आहे. म्हणून तरुणांनी दर आठवड्याला ७० तास (६ दिवस रोज १२ तास) कामासाठी सज्ज असले पाहिजे. दुसऱ्या महायुद्धानंतर जपान, जर्मनीने असे करून शिखर गाठले आहे, असे इन्फोसिसचे सहसंस्थापक एन. आर. नारायण मूर्ती (N. R. Narayan Murthy) यांनी पॉडकॉस्ट ‘द रेकॉर्ड’मध्ये असे म्हटले आहे.
यावेळी इन्फोसिसचे माजी सीएफओ मोहनदार पई यांच्याशी विविध मुद्द्यांवर चर्चा करताना ते म्हणाले की, भारतातील तरुणांनी पुढे येऊन म्हटले पाहिजे की, हा माझा देश आहे. मी आठवड्यातील ७० तास काम करू इच्छित आहे. जोपर्यंत आपण उत्पादकतेत सुधारणा करत नाही, सरकारमधील भ्रष्टाचार कमी करत नाही तोपर्यंत आपण इतर देशांसोबत स्पर्धा करू शकणार नाही.
(हेही वाचा – Sharad Pawar : मोदींनी पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा राखावी…शरद पवारांचे प्रत्युत्तर)
आपल्या संस्कृतीचे अधिक जिद्द, शिस्तप्रिय आणि कठोर परिश्रम करणाऱ्या लोकांमध्ये रुपांतर करावे लागेल. जोपर्यंत आपण असे करत नाही, तोपर्यंत कोणतेही सरकार काहीच करू शकत नाही. बदलाची सुरुवात तरुणांपासून व्हायला हवी. उत्तम कामगिरी करून तुम्ही जगात स्वत:ला सिद्ध करू शकता. चीन याचे मोठे उदाहरण आहे. आगामी २० ते ५० वर्षांपर्यंत आपल्याला अशीच शिस्तप्रिय कार्यसंस्कृती विकसित करावी लागेल. जेणेकरून भारत जीडीपीच्या बाबतीत अव्वल ठरेल.
तंत्रज्ञानाचे महत्त्व सांगताना ते म्हणाले की, तंत्रज्ञानाने उत्तम शिक्षण मिळत आहे. आपण आधीच्या तुलनेत वेगाने प्रगती करत आहोत. तंत्रज्ञानामुळे आत्मविश्वास वाढतो, हाच तंत्रज्ञानाचा मोठा फायदा आहे.