गणेशोत्सवातील मंडपांच्या भाडे माफीसाठी युवा सेना सरसावली

१०० टक्के राजकारण आणि १०० टक्के समाजकारणाची झलक या दोन्ही युवा सेनेच्या नगरसेवकांनी आपल्या मागणीतून दाखवून दिली आहे.

77

गणेश मूर्तिकार आणि मूर्ती विक्रेत्यांना मंडप भाडे माफ करण्याची मागणी शिवसेना नगरसेवक आणि युवा सेना पदाधिकारी अमेय घोले यांनी केली. त्यानंतर शिवसेनेचे प्रभादेवी येथील नगरसेवक आणि युवा सेना पदाधिकारी समाधान सरवणकर यांनी गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांना महापालिकेचे भाडे, परवानगी शुल्क तसेच इतर शुल्क माफ करण्याची मागणी केली आहे. युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांवर आदित्य ठाकरे यांचा पगडा असून, १०० टक्के राजकारण आणि १०० टक्के समाजकारणाची झलक या दोन्ही युवा सेनेच्या नगरसेवकांनी आपल्या मागणीतून दाखवून दिली आहे.

काय आहे मागणी?

युवा सेनेचे कोषाध्यक्ष आणि वडाळा येथील शिवसेना नगरसेवक अमेय घोले यांनी १७ जून रोजी महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना निवेदन देत, गणेश मूर्तिकारांना मंडप माफी देण्याची मागणी केली. कोरोना काळात अनेकांचे व्यवसाय बंद होण्याच्या मार्गावर आहेत. त्यात गणेश मूर्तिकार व मूर्ती विक्रेते हे गणेशोत्सव येण्यापूर्वी किमान दोन ते तीन महिने अगोदर मंडप उभारायला सुरुवात करतात. महापालिकेच्यावतीने या मंडपांसाठी ग्राऊंड रेंट घेतले जाते. त्यामुळे या वर्षाकरता हे भाडे माफ करुन गणेश मूर्तिकार आणि मूर्ती विक्रेते यांना दिलासा द्यावा, अशी मागणी अमेय घोले यांनी केली आहे.

(हेही वाचाः आता ‘बाप्पा’ही पाहत आहेत ‘नियमावली’ची वाट)

सरवणकर यांनी मागितला मंडळांसाठी दिलासा

अमेय घोले यांनी गणेश मूर्तिकार आणि मूर्ती विक्रेत्यांचे भाडे माफ करण्याची मागणी केलेली असतानाच, त्यांचे युवा सेनेचे सहकारी असलेल्या प्रभादेवी येथील शिवसेना नगरसेवक समाधान सरवणकर यांनी गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांना महापालिकेचे भाडे, परवानगी शुल्क व इतर भाडे या वर्षी माफ करण्याची मागणी केली आहे. लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केल्यानंतर आजतागायत गणपती उत्सव छोटी व मोठी मंडळे मोठ्या उत्साहाने व भक्तीभावाने साजरा करतात. परंतु यंदा कोरोनामुळे या उत्सव मंडळांवर आर्थिक संकट कोसळले असून, वर्गणी व देणग्यांचा ओघही आटला आहे. मात्र, गणेशोत्सव साजरा करायचाच असा त्यांचा निर्धार आहे.

मुख्यमंत्र्यांकडे केली मागणी

छोटी व मोठी उत्सव मंडळे ही महापालिकेच्या मैदानात व इतरत्र परवानगी घेऊन मंडपांचे भाडे भरुन उत्सव साजरे करतात. पण यंदा कोरोनाच्या आर्थिक संकटामुळे मंडपाचे व इतर परवानग्यांचे भाडे भरणे हे उत्सव मंडळांच्या आवाक्याबाहेर आहे. त्यामुळे या वर्षी उत्सव मंडळांना मंडपांच्या भाडे व शुल्कात माफी देण्यात यावी आणि यंदा शासनाच्या अटी व शर्तीनुसार साजरा करण्यास मानवतेच्या दृष्टीने सहकार्य करण्यात यावे, अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

(हेही वाचाः मुख्यमंत्र्यांची विदेशात बेकायदेशीर संपत्ती; ‘हा’ आमदार करणार ईडीकडे तक्रार)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.