मुंबई विमानतळावरून 1.42 कोटींचे परदेशी चलन जप्त!

130

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) १ कोटी ४२ लाख ७५ हजार १८ रुपये मूल्याचे परदेशी चलन जप्त केले. महसूल गुप्तचर संचालनालयाने परदेशी चलनाची भारताबाहेर तस्करी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका व्यक्तीला अटक केली आहे.

अचूक गोपनीय माहितीच्या आधारे, इंडिगो विमान क्रमांक 6E 5362 ने करण सिंग हा व्यक्ती जोधपूरहून मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे आला. हा व्यक्ती ३ डिसेंबर रोजी दुबईच्या विमान क्रमांक 6E 61 मधून प्रवास करणारा होता. या दरम्यान, महसूल गुप्तचर संचालनालयाच्या मुंबई क्षेत्रीय विभागाच्या अधिकाऱ्यांनी करण सिंग याला अडवले.

परकीय चलन जप्त

या व्यक्तीच्या सामानाची तपासणी केली असता, त्याच्या कपड्यांमध्ये पांढऱ्या रंगाचे लिफाफे लपवल्याचे आढळून आले. हे लिफाफे उघडले असता विविध मूल्यांचे विदेशी चलन त्यात आढळून आले. एकूण १ लाख ३२ हजार मूल्याचे अमेरिकी डॉलर्स, ४२ हजार १५० मूल्याचे युरो, २९ हजार पाचशे मूल्याचे सौदी अरेबियन रियाल आणि ६ लाख मूल्याचे जपानी येन असे एकूण १ कोटी ४२ लाख ७५ हजार ०१८ रुपयांचे परकीय चलन १९६२ च्या सीमाशुल्क कायद्याच्या तरतुदींनुसार जप्त करण्यात आले.

आरोपीला न्यायालयीन कोठडी

करण सिंहला ४ डिसेंबरला अटक करण्यात आली. त्याला मुख्य महानगर दंडाधिकारी यांच्यासमोर हजर करण्यात आले आणि त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. तपासादरम्यान, लेखराज मेवारा या व्यक्तीने हे सामान करण सिंहला दिल्याचे समोर आले. त्यानंतर लेखराजला ५ डिसेंबरला अटक करून न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

( हेही वाचा : अरेरे…! भारतातील फक्त १ टक्के जनता गर्भश्रीमंत! )

आठवड्यातील दुसरी घटना

महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी वेळीच केलेल्या कारवाईमुळे ही घटना उघडकीस आली. मुंबईतील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील परकीय चलनाच्या तस्करीच्या प्रयत्नाची आठवड्यातील ही दुसरी घटना आहे. यापूर्वी महसूल गुप्तचर संचालनालयाने २६ नोव्हेंबरला मुंबईतील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे ५ लाख अमेरिकी डॉलर्स जप्त करून ४ जणांना अटक केली होती.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.