ऋजुता लुकतुके
देशात ऑगस्ट महिन्यात १० अब्जांच्या वर आर्थिक व्यवहार युपीआयने झाले. आणि त्यांचं एकूण मूल्य १५ ट्रिलियन रुपये इतकं होतं. ही आकडेवारी रिझर्व्ह बँकेची एक दुय्यम संस्था नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने दिली आहे. NPCI ही संस्थाच युपीआय व्यवहारांवर लक्ष ठेवते आणि तशी सुविधा लोकांना उपलब्ध करून देते.
NPCI ने बुधवारी (३० ऑगस्ट) ट्विट करून १० अब्जांचा टप्पा पार झाल्याची बातमी दिली आहे.
30th AUGUST 2023: DAILY PAYMENTS STATISTICS #BBPS #CTS #NACH #NFS pic.twitter.com/nFlec8QZ14
— NPCI (@NPCI_NPCI) August 31, 2023
ताज्या आकडेवारीनुसार असं लक्षात येतं की, युपीआयचा वापर गेल्यावर्षीच्या तुलनेत तब्बल ५० टक्क्यांनी वाढला आहे. गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात ६.६८ अब्ज व्यवहार झाले होते. यावर्षी जुलै महिन्यात ९.९६ अब्ज व्यवहार झाले. आणि आता ऑगस्टमध्ये अखेर १० अब्जांचा टप्पा पार झाला. कोव्हिडच्या काळात २०१९ मध्ये ऑक्टोबर महिन्यात १० अब्जांचा टप्पा एकदा पार झाला होता.
(हेही वाचा- Dombivli Traffic : वाहतूक कोंडीवर पोलिस मिळवणार नियंत्रण)
त्यानंतर युपीआय व्यवहार पुन्हा थंडावले. पण, आता पुन्हा युपीआयला चालना मिळत आहे. आणि जाणकारांच्या मते या व्यवहारांमध्ये वाढीला अजून वाव आहे. पिअर – टू – मर्चंट म्हणजे व्यक्तीकडून थेट व्यावसायिक किंवा उद्योजकाला पैसे दिले जाण्याचे व्यवहार वाढू शकतात असं जाणकारांना वाटतं. सध्या युपीआयचे व्यवहार हे दोन व्यक्तींमध्ये किंवा दोन खात्यांमध्ये होतात.
देशाचे अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांनी १३ मार्च रोजी लोकसभेत बोलताना डिजिटल पेमेंट्सविषयी एक महत्त्वाची माहिती दिली होती. ‘आर्थिक वर्ष २०१९ पासून आधार-आधारित पेमेंट प्रणाली, युपीआय आणि युपीआय लाईट यांचा वापर २०० टक्क्यांनी वाढल्याचं,’ कराड यांनी म्हटलं होतं.
आता NPCI ने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, व्यक्तीकडून मर्चंट किंवा व्यावसायिक हेतूने झालेले व्यवहार ५८ टक्के आहेत. अशा व्यवहारांचं मूल्यही ५.७८ अब्ज रुपये इतकं आहे. पण, एका खात्यातून दुसऱ्या वैयक्तिक खात्यात झालेल्या व्यवहारांचं मूल्य तब्बल ११.४८ अब्ज रुपये इतकं आहे. म्हणजेच एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पैसे हस्तांतरित करताना मोठ्या रकमेचे व्यवहारही युपीआयने होत आहेत. तेच व्यावसायिक वापरासाठी फक्त लहान रकमांचे व्यवहार युपीआयने होतायत. युपीआय ॲपचा विचार करता, देशात फोनपे आघाडीवर आहे. युपीआय व्यवहारांमध्ये त्यांचा वाटा ४७ टक्के आहे. तर गुगल पे (३५ टक्के) आणि पेटीएम १४ टक्के हे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community