कोकण रेल्वे म्हणजे मुंबईकर चाकरमान्यांचा जिव्हाळ्याचा विषय! याच कोकण रेल्वेने १०० टक्के विद्युतीकरण केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोकण रेल्वेचे कौतुक करत लोकार्पण केले. डिझेलमुळे होणारा खर्च, इंजिनातून निघणाऱ्या धुरामुळे होणारे प्रदूषण टाळण्यासाठी गेल्या वर्षांपासून रेल्वे मंत्रालयाकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. विद्युतीकरणामुळे कोकणवासीयांचा प्रवास प्रदूषणमुक्त आणि वेगवान होईलच तसेच कोकणचे नैसर्गिक सौंदर्य सुद्धा अबाधित राहण्यास मदत होईल.
( हेही वाचा : Budget Trip : पावसाळ्यात फिरण्यासाठी सुंदर आणि हटके जागा!)
रोहा ते ठोकूर असा एकूण ७०० किलोमीटरचा कोकण रेल्वेमार्ग आहे. रोह्यापासून पुढे विद्युतीकरण नसल्याने डिझेलवरील इंजिन बसविण्यात यायचे यामुळे वेळेचा अपव्यय होण्याबरोबरच प्रदूषण होऊन पर्यारणाला हानी पोहोचत होती. म्हणूनच कोकण रेल्वेने विद्युतीकरणासाठी पुढाकार घेतला. रोहा ते ठोकूर या विद्युतीकरणाच्या कामाला सात ते आठ वर्षांचा कालावधी लागला. ७०० किलोमीटर मार्गाचे विद्युतीकरण सहा टप्प्यांमध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. सहा टप्पे – रोहा ते रत्नागिरी, बिजूर ते ठोकूर, कारवार ते बिजूर, कारवार ते वेरणा, वेरणा ते थिविम, रत्नागिरी ते थिविम.
विद्युतीकरणाचा फायदा
मुंबई ते कोकण या मार्गावर जवळपास २० रेल्वेगाड्या धावतात. विद्युतीकरणामुळे कोकणाचे सौंदर्य अबाधित राहून प्रदूषण कमी होईलच शिवाय सर्व रेल्वेगाड्या विजेवर सुरू केल्यानंतर तब्बल १५० कोटींची बचत करणे शक्य होणार आहे असा विश्वास कोकण रेल्वेने व्यक्त केला आहे. मेल, एक्स्प्रेस गाड्यांचा वेगही विद्युतीकरणामुळे वाढणार आहे.
या दहा रेल्वे गाड्या विजेवर धावणार
- मांडवी
- जनशताब्दी
- कोकणकन्या
- मस्त्यगंधा
- नेत्रावती
- मंगला एक्सप्रेस
- मडगाव पॅसेंजर
- मंगळूर-सीएसएमटी एक्स्प्रेस
- तिरूवनंतपुरम – निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेस
- मडगाव – निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेस