पोटदुखीमुळे सुमारे वर्षभरापेक्षा अधिक कालावधीसाठी त्रस्त असलेल्या ५२ वर्षे वयाच्या महिलेवर मुंबई महानगरपालिकेच्या तज्ञ वैद्यकीय मंडळींनी यशस्वीपणे शस्त्रक्रिया करून तब्बल ११ किलो वजनाचे फायब्रॉइड अर्थात गर्भाशयाच्या मांसपेशींपासून तयार झालेली गाठ काढली. एवढ्या जास्त वजनाचे फायब्रॉईड असणे, हा दुर्मिळ प्रकार असून त्यामुळे शस्त्रक्रियाही गुंतागुंतीची आणि अतिशय अवघड होती. मात्र उपनगरीय रुग्णालयांमध्ये सुरू झालेल्या डीएनबी वैद्यकीय अभ्यासक्रमामुळे आणि उपलब्ध अत्याधुनिक वैद्यकीय यंत्रसामुग्रीमुळे ही शस्त्रक्रिया करण्याचे आव्हान महानगरपालिकेच्या राजीवाडी रुग्णालयातील वैद्यकीय तज्ञांनी यशस्वीपणे पेलले.
यासंदर्भात माहिती देताना राजावाडी रुग्णालय प्रशासनाने सांगितले की, सुमारे ५२ वर्षे वय असणारी एक महिला, रजोनिवृत्तीनंतरची पोटदुखीची तक्रार घेऊन घाटकोपरमधील महानगरपालिकेच्या राजावाडी रुग्णालयाच्या बाहयरुग्ण विभागात आली. तेथे स्त्री-रोगतज्ञ डॉ. स्वाधीना मोहंती यांनी या रुग्णाची वैद्यकीय तपासणी केली असता रुग्णाच्या पोटाचे आकारमान प्रमाणाबाहेर वाढल्याचे आढळले. त्यामुळे तातडीने सोनोग्राफी आणि एमआरआय तपासणी करण्यात आली. त्यात असे निदर्शनास आले की, गर्भाशयात खूप मोठे फायब्रॉइड आहे, ज्यामुळे रक्तवाहिन्या, आतडी आणि मूत्राशय विस्थापित झाले होते. (फायब्रॉइड ही गर्भाशयाच्या मांसपेशींपासून तयार झालेली एक प्रकारची गाठ असते. शरीरातील स्त्री हार्मोन्समधील बदलामुळे अशा प्रकारच्या गाठी होतात.) परिणामी रुग्णाला वेगवेगळ्या शारीरिक आरोग्य समस्या जाणवत होत्या. रुग्णाचा रक्तगट दुर्मिळ असा आरएच निगेटिव्ह होता. तसेच रक्तक्षय व हायपोथायरॉईडचा आजारही जडला होता. या आजार आणि त्यातून उद्भवणाऱ्या इतर समस्यांमुळे संबंधित रुग्णाला मागील वर्षभरापासून पुरेशी झोपही घेता येणे शक्य होत नव्हते.
(हेही वाचा पुरुष क्रिकेट संघासह महिला क्रिकेटपटूंनीही साजरी केली धुळवड )
सर्व वैद्यकीय तपासणी आणि अहवालांचे अभ्यास करून झाल्यानंतर राजावाडी रुग्णालयाच्या वैद्यकीय चमुने या महिलेवर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. सदर जोखमीची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण करण्यात आली. शल्यचिकित्सक, भूलतज्ज्ञ आणि शस्त्रक्रियागार कर्मचारी यांनी त्यासाठी अथक परिश्रम घेतले. स्त्रीरोग विभागातील वरिष्ठ डी.एन.बी. शिक्षक डॉ. स्वाधीना मोहंती, कनिष्ठ डी.एन.बी शिक्षक डॉ. शालिनी, वरिष्ठ प्रबंधक डॉ. पायल, भूलतज्ञ विभागातील ज्येष्ठ डी.एन.बी शिक्षक डॉ. रिना, वरिष्ठ प्रबंधक डॉ. अविनाश, शस्त्रक्रियागार विभागातील परिचारिका सोनाली आणि इतर कर्मचारी यांच्या चमूने यात आपापली भूमिका तत्परतेने निभावली.
या शस्त्रक्रियेअंती काढण्यात आलेल्या फायब्रॉइडचे वजन ११ किलो होते, जे अत्यंत दुर्मिळ प्रकरण मानले जाते. ही शस्त्रक्रिया करत असताना मोठ्या रक्तवाहिन्या सुरक्षित करण्यासाठी तसेच मूत्रवाहिनी आणि मूत्राशय हे दोन्ही सुरक्षित राखण्यासाठी अतिशय काळजीपूर्वक आणि कौशल्य पणाला लावून वैद्यकीय तज्ञांनी शस्त्रक्रिया पूर्ण केली. परिणामी शस्त्रक्रिये दरम्यान रक्तस्त्राव अपेक्षेपेक्षा कमी झाला आणि रुग्णाच्या जीविताला कोणताही धोका पोहोचला नाही.
(हेही वाचा राहुल गांधींचे चीन प्रेम; नेटकरी घेतायेत खरपूस समाचार )
आता ही रुग्ण महिला शस्त्रक्रिया पश्चात उपचार घेवून पूर्णपणे बरी झाली आहे. या महिलेने शस्त्रक्रियेनंतर सांगितले की, त्यांना आता पोटात खूप हलके आणि एकूणच बरे वाटते. पोटाच्या गाठीतील वजनामुळे, त्यातून येणाऱ्या अस्वस्थतेमुळे मागील एक वर्षभर पुरेशी झोप घेता आली नव्हती. आता पूर्णपणे बरे झाल्यानंतर झोप पुरेशी लागत असून त्यामुळे आयुष्य पुन्हा आनंदी झाले असल्याची भावना या रुग्णाने व्यक्त केली.
महानगरपालिकेच्या उपनगरीय रुग्णालयांमध्ये डी.एन.बी. अभ्यासक्रम सुरू केल्याने आणि प्रशासनाच्या सर्व सहकार्यामुळे अशा स्वरूपाच्या क्लिष्ट, जोखमीच्या तसेच दुर्मिळ शस्त्रक्रिया उपनगरीय रुग्णालयांमध्येच सुरक्षितपणे करणे आता शक्य झाले आहे. परिणामी रुग्णांना वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्याची गरज न पडता स्थानिक पातळीवर उत्कृष्ट वैद्यकीय उपचार मिळत आहेत, असे प्रमुख वैद्यकीय अधीक्षक डॉ. विद्या ठाकूर यांनी नमूद केले.
Join Our WhatsApp Community