स्वातंत्र्यप्राप्तीच्या अग्निकुंडात स्वातंत्र्यवीर सावरकरांनी घेतलेली ऐतिहासिक ‘उडी’

276

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर… या नावातच प्रखर राष्ट्रभक्तीचं तत्व दडलेलं आहे. त्यांच्या प्रत्येक कृतीतून, लेखणीतून अवतरलेल्या प्रत्येक अक्षरातून मातृभूच्या स्वातंत्र्याचा ध्यासच अनुभवास येतो. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ब्रिटीशांच्याच भूमीत राहून त्यांना दिलेले आव्हान, त्यानंतर त्यांना अंदमानच्या सेल्यूलर जेलमध्ये 11 वर्ष सोसाव्या लागलेल्या हालअपेष्टा, रत्नागिरीत स्थानबद्धतेत घालवलेली 13 वर्ष हा संपूर्ण घटनाक्रम बघितला तर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केलेल्या सशस्त्र क्रांतिकार्याला सशक्त त्यागाची जोड होती हेच आपल्याला दिसून येईल.

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मार्सेलिसच्या समुद्रात उडी घेतली, जी त्रिखंडात गाजली. या उडीमुळे स्वातंत्र्यप्राप्तीच्या अग्निकुंडाचं अग्निहोत्र झालं. याच ऐतिहासिक उडीला आज 8 जुलै 2022 रोजी तब्बल 112 वर्षे पूर्ण होत आहेत. वीरश्रीने संचारलेल्या या उडीची ही साहसगाथा…

ब्रिटिशांचे ‘डेंजरस्’ कैदी

फ्रान्समधल्या मार्सेलिस बंदरावर मोरिया बोट काही काळासाठी स्थिरावली होती. तो दिवस होता ७ जुलै १९१०. त्या बोटीत होते स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. ब्रिटिशांचे अतिशय ‘डेंजरस्’ कैदी.. कारण लंडनला, त्या शत्रूच्या शिबिरातच जाऊन सावरकरांनी इतर देशातल्या क्रांतिकारकांच्या सहाय्यानं अभिनव भारत या आपल्या क्रांतिकारी संघटनेचं जाळं विणलं होतं. पिस्तुलं जमवली होती, बॉम्ब बनवण्याचं प्रशिक्षण मिळवलं होतं. भारताच्या स्वातंत्र्याचा प्रश्न जागतिक स्तरावर पोहोचवण्याचा सावरकरांचा प्रयत्न होता कारण भारतीयांच्या इच्छेनुसारच आम्ही त्यांच्यावर राज्य करत आहोत असा अपप्रचार ब्रिटिश करत होते.

सावरकरांची साहसी उडी 

सावरकरांच्या ब्रिटिशविरोधी कारवायांमुळे त्यांना अटक करण्याची संधीच ब्रिटीश शोधत होते आणि ती त्यांना मिळाली. लंडनमध्ये मदनलाल धिंग्रांनी कर्झन वायलीचा वध केला, त्यातून स्फूर्ती घेऊन इकडे भारतात अनंत कान्हेरे आणि त्यांच्या साथीदारांनी जॅक्सनचा खात्मा केला, ज्योतीने ज्योत पेटत होती. सावरकरांची अटक निश्चित होती आणि ती झालीही. आंतरराष्ट्रीय कायद्याचा, इतिहास, भूगोलाचा सावरकरांचा अभ्यास होता.आपल्याला कुठल्या बोटीने, कुठल्या मार्गे जायचे आहे, बोट कुठे थांबणार हे कळल्याबरोबर सावरकरांची योजना सिद्ध झाली. सावरकरांच्या सुटकेचा प्रयत्न होईल अशी ब्रिटिशांना भीती होतीच, त्यामुळे त्यांनी बोटीचा मार्ग बदलला. पण काहीतरी बिघाड झाला आणि मार्सेलिस बंदरात मोरिया बोट उभी राहिली आणि ८ जुलै १९१० या दिवशी सावरकरांनी अत्यंत धाडसानं अथांग सागरात उडी घेतली.

मादाम कामा, व्ही. व्ही. एस. अय्यर यांचा निरोप घेताना मार्सेलिस बंदरात बोट थांबते, असे सुतोवाच सावरकरांनी केले होते. त्यानुसार ते दोघे बंदरावर पोहोचलेही पण त्यांना पोहोचायला जरासा उशीर झाला. आंतरराष्ट्रीय निर्बंधांनुसार फ्रेंच पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर ब्रिटिश काही करू शकणार नाहीत हा सावरकरांचा कयास होता. पण फ्रेंच पोलिसांना सावरकरांचं इंग्रजीतलं बोलणं कळलं नाही आणि त्यांना ब्रिटिश पोलिसांच्या ताब्यात दिलं गेलं.

आंतरराष्ट्रीय स्तरावर काय घडलं या उडीनं?

मार्सेलिसचे महापौर जां. जोरे यांनी हा फ्रान्सच्या सार्वभौमत्वाचा अपमान आहे असं म्हणत सावरकरांच्या अटकेचा प्रश्न उचलून धरला. ब्रिटीश, अटकेचं वृत्त दडपून टाकण्याच्या प्रयत्नात होते. पण मादाम कामांच्या प्रयत्नानं हे वृत्त ‘ल ताँ’ या फ्रेंच वृत्तपत्रात आणि ‘डेली मेल’ मध्येही प्रसिद्ध झाले. कार्ल मार्क्स यांचे नातू आणि फ्रेंच वृत्तपत्र ‘ल्यूमानिते’चे संपादक जाँ लोंगे यांनीही याबाबत एक जळजळीत लेख लिहिला. सावरकरांना फ्रान्सच्या ताब्यात दिलं पाहिजे असा जोरदार प्रचार फ्रान्समधली सर्वच छोटी-मोठी वृत्तपत्रं करत होती. युरोपीय वृत्तपत्रांनीही याप्रकरणी फ्रेंच वृत्तपत्रांना साथ दिली. या उडीचे सावरकारांना अपेक्षित पडसाद उमटले, त्रिखंडात ही उडी गाजली. त्यांच्या साहसी उडीनं संपूर्ण युरोपातलं राजकीय वातावरण ढवळून निघालं. परदेशात प्रथमच भारताविषयी चर्चा सुरु झाली. सावरकरप्रेमी गाय आल्ड्रेड, श्यामजी कृष्ण वर्मा, मादाम कामा आणि इतरांचेही सावरकरांच्या सुटकेसाठी आटोकाट प्रयत्न सुरू होतेच.

इकडे भारतात आणून, सावरकरांना आधी नाशिक आणि नंतर येरवड्याच्या कारागृहात ठेवण्यात आलं होतं तरी त्यांच्यापर्यंत या बातम्या पोहोचत होत्या. सावरकरांनी त्या साऱ्या घटनेचा साद्यंत वृत्तांत लिहून ते निवेदन गुप्तपणे युरोपमध्ये पाठवलं. तिथल्या सर्व वृत्तपत्रांनी ते छापलं आणि सावरकरांना फ्रान्समध्ये पाठवण्याच्या मागणीचा सर्वच वृत्तपत्रांनी पुन्हा प्रचार सुरु केला.

या दबावामुळे फ्रान्सनं ब्रिटनकडे, सावरकरांना फ्रान्सला परत पाठवण्याची पुन्हा मागणी केली आणि ब्रिटनलाही यावेळी या मागणीपुढे नमतं घ्यावं लागलं आणि या प्रश्नासाठी हेग आंतरराष्ट्रीय लवादाची स्थापना झाली. १६ फेब्रुवारी १९११ ला या प्रकरणाची सुनावणी सुरु होऊन २४ फेब्रुवारी १९११ ला घाईघाईनं ब्रिटिशांच्या बाजूनं निर्णयही देण्यात आला. या धक्कादायक निकालाविरुद्ध इंग्लंडमधील मॉर्निंग पोस्ट, डेली न्यूज, जर्मनीतील पोस्ट अशा अनेक देशातल्या वृत्तपत्रांतून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.

फ्रेंच पंतप्रधान ब्रिआँ यांना मात्र या निर्णयाची जबरदस्त किंमत मोजावी लागली. फ्रेंच लोकसभेला तोंड देणं टाळण्यासाठी त्यांनी राजीनामाच दिला. अर्थात या निर्णयापूर्वीच भारतात ३० जानेवारी १९११ लाच सावरकरांना दोन जन्मठेपेची, काळ्यापाण्याची शिक्षा सुनावलीही गेली होती. वीर सावरकरांच्या सुटकेचा प्रयत्न जरी अयशस्वी झाला असला, तरी त्यांची ती उडी पूर्णपणे यशस्वी झाली. कारण सावरकरांच्या इच्छेनुसार भारताच्या स्वातंत्र्याचा प्रश्न जगभर निनादू लागला होता.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.