चेंबूर कॅम्प येथे गारमेंट कारखान्याचा स्लॅब कोसळून १२ जण जखमी झाले आहे. जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ही दुर्घटना गुरुवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास चेंबूर वसाहत पुष्पा इंडस्ट्रीज या ठिकाणी घडली.
दुर्घटनेत १२ कामगार जखमी
चेंबूर कॅम्प या ठिकाणी असलेल्या पुष्पा इंडस्ट्रीज इस्टेट या ठिकाणी १५ ते २० गारमेंटचे गाळे असून या गाळ्यामध्ये एका वर एक असे दोन मजले बांधण्यात आले आहेत. यापैकी एका गारमेंटच्या गाळ्यातील पहिल्या मजल्यावरील स्लॅब खालच्या मजल्यावर कामगारांच्या अंगावर कोसळून झालेल्या दुर्घटनेत १२ कामगार जखमी झाले आहेत. घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दल आणि पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना तात्काळ उपचारासाठी नजीकच्या इनलेक्स रुग्णालयात दाखल केले आहे.
( हेही वाचा : New Labour Code : १ जुलैपासून नवे कामगार कायदे! खासगी कर्मचाऱ्यांच्या वार्षिक सुट्ट्यांमध्येही होणार मोठा बदल)
जखमींपैकी दोघांवर प्राथमिक उपचार करून सोडून देण्यात आले असून इतरांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. जखमीमध्ये एका महिलेचा समावेश असून दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. जखमीमध्ये १८ ते ५० वयोगटातील व्यक्तींचा समावेश आहे.
Join Our WhatsApp Community