पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गेल्या काही वर्षांत मिळालेल्या भेटवस्तूंचा लिलाव होणार आहे. यात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मोदींना दिलेल्या अंबाबाईच्या मू्र्तीचाही लिलाव होणार आहे. येत्या 17 सप्टेंबरपासून या लिलावाला सुरुवात होणार आहे. राजधानी नवी दिल्लीतल्या नॅशनल गॅलरी ऑफ माॅडर्न आर्टमध्ये हा लिलाव होणार आहे. या लिलावात पंतप्रधान मोदींना मिळालेल्या एकूण 1200 वस्तू ठेवण्यात येणार आहेत. या लिलावात कोणालाही भाग घेता येणार आहे.
मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मोदींना राणी कमलापतींची मूर्ती भेट दिली होती. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी यांनी मोदींना हनुमानाची मूर्ती भेट दिली होती. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी त्यांना त्रिशूळ भेट दिला होता. या सर्व वस्तू लिलावात ठेवण्यात येणार आहेत.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांची मूर्तीही लिलावात
मेडल विजेत्या खेळाडूंच्या स्वाक्षरीचे टी शर्ट, बाॅक्सिंग ग्लोव्हज, जॅवलिन आणि रॅकेटसारखे स्पोर्ट्स आयटमही या लिलावात ठेवण्यात येणार आहेत. या लिलावात अयोध्याचे श्रीराम मंदिर आणि वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिराची रिल्पिकाही ठेवण्यात येणार आहे. तसेच, आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी दिलेली भगवान व्यंकटेश्वरची मूर्ती, नेताजी सुभाषचंद्र बोस यांची मूर्तीही लिलावात ठेवण्यात येणार आहे. सुभाषचंद्र बोस यांच्या मूर्तीची बेस प्राईस पाच लाख रुपये ठेवण्यात आली आहे.
‘या’ गोष्टींचाही समावेश
टोक्यो 2020 पॅरालिम्पिक आणि टोक्यो 2020 ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेतील विजेत्यांनी पंतप्रधानांना भेटवस्तू म्हणून दिलेले क्रीडा साहित्य आणि उपकरणांचा या ई- लिलावात समावेश आहे. इतर चित्तवेधक कलाकृतींमध्ये अयोध्या राममंदिर, चारधाम, रुद्राक्ष कन्व्हेन्शन सेंटरची प्रतिकृती शिल्प, चित्रे, वस्त्रे आदींचा समावेश आहे.
सुवर्णपदक विजेत्यांचा भाला सर्वाधिक किंमतीचा
ई- लिलावाच्या या फेरीत सुमारे 1 हजार 330 स्मृतीचिन्हांचा ई- लिलाव केला जात आहे. टोक्यो 2020 पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता सुमित अंतिल यांनी वापरलेला भाला आणि टोकियो 2020 ऑलिम्पिक गेम्समध्ये नीरज चोप्रा यांनी वापरलेला भाला हा सर्वात जास्त किंमत असलेली वस्तू आहे. तसेच, रुपये 200 किंमतीचा लहान आकाराचा सजावटीचा हत्ती हा सर्वात कमी किंमत असलेली वस्तू आहे.
( हेही वाचा: महाराजांच्या नावाने राजकारण करायचे आणि गुणगान मात्र शहंशाहचे; भाजपचे राष्ट्रवादीवर टीकास्त्र )
ई-लिलावातून मिळणारी रक्कम ही गंगेचे संरक्षण आणि कायाकल्प करण्यासाठी वापरणार
या ई-लिलावातून मिळणारी रक्कम ही गंगेचे संरक्षण आणि कायाकल्प करण्याच्या उद्देशाने नमामि गंगे अभियानाला जाईल. नामामि गंगे अभियानाद्वारे देशाची जीवनरेषा- गंगा नदीचे संरक्षण करण्याच्या उदात्त कारणासाठी मिळालेल्या सर्व भेटवस्तूंचा लिलाव करण्याचा निर्णय घेणारे नरेंद्र मोदी हे भारताचे पहिले पंतप्रधान आहेत.
Join Our WhatsApp Community