घरची श्रीमंती बघून १३ वर्षाच्या मयांकचे अपहरण करून हत्या

174

“मयांकच्या घरची श्रीमती बघून आम्ही मयांकचे अपहरण करण्याचा कट रचला होता. त्यानंतर मयांकचे अपहरण केले, त्याला जिवंत सोडल्यावर तो आमच्या विरुद्ध तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात जाईल या भीतीने त्याला सर्वात अगोदर ठार मारले, त्यानंतर मयांकच्या आईला फोन लावून ३५ लाख रुपयांची खंडणी मागितली होती,” अशी कबुली अटक करण्यात आलेल्या मयांकच्या दोन मित्रांनी पोलिसांना दिली.

( हेही वाचा : …तर २०१७च्या निवडणुकीप्रमाणे २२७ प्रभागांचे आरक्षण राहिल कायम?)

मीरा रोड पूर्व येथे उघडकीस आलेल्या १३ वर्षाच्या मुलाचे अपहरण आणि हत्येच्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती. तपास पथकाने याप्रकरणी २४ तासांत या दोन आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. अफजल अन्सारी (२२) आणि इम्रान शेख (२२) असे अटक करण्यात आलेल्या दोन्ही मित्रांची नावे आहेत. एक जण गॅरेजमध्ये काम करीत होता तर दुसरा आरोपी हा सलून मध्ये कामाला होते. मीरारोड येथील शांती पार्क येथील क्लस्टर सोसायटी या ठिकाणी मयांक हा आई, मामा मामी,मावशी आणि मामाची मुले यांच्यासोबत राहत होता.

३१जुलै रोजी मयांकला सिगारेट ओढताना मामाने बघितले होते, व त्याने हा प्रकार मयांकची आईला सांगितला होता, आईने त्याला ओरडा दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी आई कामावर गेलेली असताना मयांक हा घरातून निघून गेला होता. त्याचा शोध घेण्यात आला मात्र तो कुठेच भेटला नाही म्हणून आईने काशीमीरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मयांक हा १३ वर्षीय अल्पवयीन असल्यामुळे पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. त्याचा शोध सुरु असताना मंगळवारी मयांकचा मृतदेह वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीत वसई येथे सापडला.

तत्पूर्वी मयांकच्या आईच्या फोनवर एका अज्ञात क्रमांकावरून एका व्यक्तीने फोन करून त्याचे अपहरण करण्यात आले असून त्याच्या सुटकेसाठी ३५ लाख रुपयांची मागणी केली होती. काशिमीरा पोलिसांनी अपहरण, खंडणी आणि हत्याचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

सिमकार्डमुळे सापडले आरोपी…

अपहरणकर्त्यानी मयांकची हत्या केल्यानंतर त्याच्या जवळ असलेला मोबाईल फोन काढून घेतला, व त्यात आरोपीपैकी एकाने स्वतःचे सिमकार्ड टाकले, मयांकचा फोन सुरू होताच पोलिसांनी लोकेशन वरून आरोपीचा शोध घेऊन अफजल आणि इम्रान या दोघांना अटक केली. हे दोघे मयांक याचे मित्र असून त्यांनीच मयांकच्या घरची श्रीमंती बघून त्याच्या अपहरणाचा कट रचला होता, परंतु मयांकला असेच सोडले तर आपले बिंग फुटेल म्हणून त्यांनी त्याची हत्या करून मृतदेह वसई येथील वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या महामार्गलगत टाकला अशी माहिती चौकशीत समोर आली. मयांकला मारूनच खंडणी वसूल करण्याची त्यांची पुर्वनियोजित योजना होती अशी माहिती काशिमिरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांनी दिली. या दोन्ही आरोपींना ६ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.